मुख्यमंत्री म्हणाले,मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की आज तिथे (घटनास्थळी) नौदलाचे अधिकारी जाणार आहेत तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे घटनास्थळी पोहोचले आहेत.तिकडे जाण्यापूर्वी मी त्यांना काही सूचना केल्या आहेत.आज नौदलाचे अधिकारी व आमचे अधिकारी स्मारकाची पाहणी करतील व आजपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पुन्हा उभारणीच्या कामाला सुरुवात केली जाईल. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी आपल्या महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दिमाखात आणि मजबुतीने उभा राहिलेला तुम्हाला दिसेल.दरम्यान हा पुतळा कोसळल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली आहे यावरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले,शेवटी ही महाराष्ट्रातील लोकांची प्रतिक्रिया आहे.महाराज हे सर्वांसाठी आराध्य दैवत आहेत.मी सर्वांना एवढेच सांगेन की आम्ही तात्काळ हा पुतळा पुन्हा उभारू.मात्र कोणीही कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही.सर्वांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखायला हवी.कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही.मी सर्वांना एवढेच आवाहन करेन की राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा.