आधीच्या मंत्रिमंडळातील सुमार कामगिरी असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांचा नवीन मंत्रिमंडळात समावेश करता येणार नाही अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली असून  शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामगिरीचा अहवालही फडणवीस यांनी शिंदेंकडून मागितला आणि तो पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे.शिवसेनेतील मंत्र्यांची नावेही भाजपच निश्चित करीत असल्याने शिंदे यांचा त्यास आक्षेप आहे.’मंत्रिमंडळात कलंकित चेहरे नको’ अशी भूमिका भाजपने घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेससमोरही पेच आहे.पक्षाचे नेते अजित पवार,छगन भुजबळ,हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने त्यांच्या निवडीबाबत काय भूमिका भाजप घेईल याचीही उत्कंठा आहे.सत्तावाटपात राष्ट्रवादीला चांगली खाती मिळावीत यासाठी अजित पवार हे गेले दोन दिवस नवी दिल्लीत होते.अजित पवार यांना अर्थ खाते मिळणार आहेत व तसे संकेत त्यांनी स्वत:च दिले आहेत. याशिवाय कृषी,सहकार,महिला ब बालकल्याण,आरोग्य,सामाजिक न्याय अशी महत्त्वाची खाती मिळावीत असा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.

गृह,महसूल,नगरविकास,सार्वजनिक बांधकाम,आरोग्य यासह महत्वाची खाती आणि केंद्रातही आणखी एका मंत्रिपदाची मागणी शिवसेनेने केली आहे.विधानपरिषद सभापतीपद मिळत नसेल तर त्याबदल्यात एखादे खाते किंवा मंत्रीपद शिवसेनेला हवे आहे.भाजप २०,शिवसेना (एकनाथ शिंदे) १२ व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ९ असे मंत्रिपदांचे वाटप होण्याची शक्यता असली तरी पवार यांनीही ११ मंत्रिपदांचा आग्रह धरला आहे.भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक विधानभवनात आज बुधवारी सकाळी दहा वाजता होईल यावेळी केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी उपस्थित राहतील. पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्याने देवेंद्र फडणवीस यांची निवड निश्चिात मानली जात आहे.आम्ही मंत्रीपदासाठी अडून बसलेलो नाही.शिंदे मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी ‘कॉमन मॅन’ म्हणून काम केले आहे.त्यांना कोणतेही मंत्रिपद मिळाले तरी ते ‘कॉमन मॅन’ म्हणूनच काम करणार आहेत.मंत्रिमंडळात कलंकित चेहरे नकोत यावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे तसेच प्रगती पुस्तक तपासूनच पुन्हा मंत्रीपदे दिली जाणार आहेत असे शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी म्हटले आहे.