महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशानंतर शपथविधी मोठ्या जल्लोषात करण्यात आला असला तरी मंत्र्यांची संख्या आणि खात्यांचे वाटप यावरून तिन्ही घटक पक्षांमध्ये सहमती न होऊ शकल्याने तिघांनीच शपथ घेतली त्यामुळे अवघ्या २० मिनिटांत हा सोहळा आटोपला.फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले तर अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.मुख्यमंत्री होऊन उपमुख्यमंत्री झालेले शिंदे दुसरेच.आझाद मैदानावरील या शपथविधी सोहळ्यात २० पेक्षा अधिक मंत्र्यांचा समावेश करण्याची मूळ योजना होती मात्र एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यातच बराच वेळ गेला यामुळे मंत्र्यांची संख्या व खात्यांचे वाटप यावर सविस्तर चर्चा होऊ शकली नाही.खातेवाटपावर शिंदे अडून बसल्याने राष्ट्रवादीनेही आपली भूमिका उघड केली नाही.या दोन्ही पक्षांशी चर्चा करून महायुतीची एकी कायम ठेवण्याचे पहिले आव्हान फडणवीस यांना पेलावे लागणार आहे.पत्रकार परिषदेत त्यांनी ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ या आपल्या घोषणेचा पुनरूच्चार केला.जनतेने आम्हाला भरभरून दिले आहे त्यामुळे लोकांच्या अपेक्षेचे ओझेही अधिक आहे मात्र येत्या काळात लोकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील.निवडणुकीच्या दरम्यान लोकांना दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता सरकार करेल मात्र त्यापूर्वी राज्याची वित्तीय स्थिती विचारात घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना पक्ष,चिन्ह आणि आमदार घेऊन बाहेर पडल्यापासून आत्मविश्वासाच्या जोरावर विरोधकांना टोलावून लावलेल्या एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षांत आपल्या शिवसेनेची बांधणी घट्ट केली.याच आत्मविश्वासाने निवडणुकीतही यश मिळवले मात्र यशाचा परिपाक असलेल्या शपथविधीच्या झगमगाटात शिंदेंच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास फिका पडला होता.देहबोलीतील हा थकवा आजारपणामुळे की राजकीय अस्वस्थतेमुळे याची चर्चा सुरू होती.महायुती सरकारमध्ये आमच्या भूमिका बदलल्या असल्या तरी गेल्या अडीच वर्षांत राज्याने विकासाची जी गती घेतली आहे त्याच गतीने महाराष्ट्र पुढे जाईल.महाराष्ट्र आता थांबणार नाही तर सर्व क्षेत्रांत राज्य अग्रेसर राहील.राज्याच्या सर्वांगीण विकासाची दिशा,गती आणि समतोलदेखील तोच राहील असे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे.