अजित पवार,एकनाथ शिंदेंची स्थिती वाईट : नाना पटोले !!

दरम्यान पटोले यांना यावर विचारण्यात आले की तुम्ही दोन उपमुख्यमंत्र्यांना म्हणजेच एकनाथ शिंदे व अजित पवार यांना काय शुभेच्छा देणार ? त्यावर पटोले म्हणाले, त्या दोघांची गत फार वाईट आहे.आपल्या पक्ष टिकेल की नाही अशी त्यांची अवस्था आहे किंवा त्यांच्या मनात भीती आहे.ही भारतीय जनता पार्टी त्यांना जगू देणार नाही कारण भाजपाची ती सवयच आहे.देशात त्यांनी जिथे-जिथे,ज्या-ज्या पक्षांबरोबर युती केली त्या सर्वांना भाजपाने संपवून टाकले.आता तुम्ही पाहतच आहात की भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या सर्व योजना बंद केल्या आहेत त्यामुळे मला वाटतं की आता एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांनी सतर्क व्हायला हवे.आम्ही त्यांच्याबरोबर आहोतच.काँग्रेस आमदार पटोले यांना त्यावर विचारण्यात आले की तुम्ही त्यांच्यासोबत आहात याचा अर्थ काय ? यावर पटोले म्हणाले,मी त्यांना होळीच्या शुभेच्छा देतांना केवळ त्यांच्या सुरक्षेबद्दलची भूमिका मांडली आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत असे म्हटले.त्यावर पटोले यांना पुन्हा विचारण्यात आले की सोबत आहात म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर जाणार की त्यांना तुमच्याकडे बोलवणार ? या प्रश्नावर उत्तर देतांना पटोले म्हणाले,“अर्थात आम्ही त्यांना आमच्याकडे बोलवणार कारण आम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहोत”.

आम्ही दोघांनाही मुख्यमंत्री करू : पटोले

नाना पटोले म्हणाले,आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.आम्ही त्यांना मुख्यमंत्री करू.त्या दोघांचीही तशी इच्छा आहे.अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची ओढ लागली आहे त्यामुळे आम्ही एकाला काही दिवस आणि दुसऱ्याला काही दिवस असे दोघांनाही मुख्यमंत्री बनवून टाकू.