मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२३ मार्च २५ रविवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार काल मुंबईत एका इफ्तार पार्टीला उपस्थिती लावली होती.यावेळी आपल्या भाषणात त्यांनी रमजानचे बंधुत्वाचा संदेश देणारा महिना म्हणून वर्णन केले आणि मुस्लिम समुदायातील लोकांना आश्वासन दिले की जर कोणी त्यांच्याकडे डोळे वटारून पाहण्याचे धाडस केले तर ते त्याला सोडणार नाही.दरम्यान अजित पवार यांच्या या विधानानंतर यावर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस आणि दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांच्यानंतर खासदार नारायण राणे यांनीही अजित पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली असून “अजित पवारांनी डोळे तपासण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे असे वाटते” असे म्हटले आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या “आमच्या मुस्लिम बांधवांकडे डोळे वटारून पाहण्याऱ्याला सोडणार नाही…” या वक्तव्यावर प्रतिक्रिया देतांना भाजपा खासदार नारायण राणे म्हणाले,“असे दिसते की अजित पवारांनी डोळे तपासण्याचा एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे.” इफ्तार पार्टीत बोलतांना अजित पवार म्हणाले होते की,“जो कोणी आपल्या मुस्लिम बांधवांकडे डोळे वटारून पाहण्याचे धाडस करेल,दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवेल आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल तो कोणीही असो त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही किंवा माफ केले जाणार नाही.”मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अजित पवार,प्रफुल्ल पटेल,सुनील तटकरे,छगन भुजबळ,सना मलिक,नवाब मलिक आणि पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते यांच्यासह मुस्लिम समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.