चुंचाळे येथे ९ मे रोजी गुरू-शिष्य पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ११ क्विंटल आंब्याचा रस व ५ क्विंटल पुरणपोळीचा महाप्रसाद !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०८ मे २५ गुरुवार
तालुक्यातील चुंचाळे येथे गुरू रघुनाथ बाबा व शिष्य वासुदेव बाबा हे एकाच दिवशी वैशाख शुद्ध बारसाला समाधिस्त झाले होते तेव्हापासुन गुरू-शिष्य पुण्यतिथीचा आनोखा सोहळा दि.९ मे रोजी श्री समर्थ वासुदेव बाबा दरबारात आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान श्री समर्थ सुकनाथ बाबा हे काशी येथुन भ्रमण करीत चुंचाळे येथे आले आणि बारा वर्ष अखंड तप केले तेव्हापासुन चुंचाळे या गावाला श्री समर्थ सुकनाथ बाबा यांची तपभुमी म्हणून ओळखली जाते.त्यानंतर त्यांचे शिष्य व चिरंजीव श्री समर्थ रघुनाथ बाबा यांचा जन्म चुंचाळे येथे झाला म्हणून त्यांची जन्मभुमी म्हणूनही ओळखले जाते.या पिता पुत्राच्या समाधीचे स्थान वर्डी ता.चोपडा येथे आहे.सुकनाथ बाबा १९३५ मध्ये तर रघुनाथ बाबा १९७९ मध्ये वर्डी ता.चोपडा येथे समाधिस्त झाले व त्यानंतर श्री समर्थ वासुदेव बाबा हे रघुनाथ बाबा सोबत राहत होते.वासुदेव बाबा हे चुंचाळे गावात १९८० मध्ये आले व त्यांनी ग्रामस्थ व शिष्यांना सहकार्याने गावात भव्य मंदिर बांधण्यास प्रारंभ केला.सुकनाथ बाबांच्या कथनाप्रमाणे मदिराला विट लावली तेव्हापासुनच गावातील घराचे देखील बांधकाम सुरू झाले.त्यानंतर १९८९ मध्ये श्री रघुनाथ बाबा यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तर श्री समर्थ सुकनाथ बाबा यांच्या २१ किलो चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सन २००० मध्ये करण्यात आली असून या मदिराचा कळस ६१ फुट उंचीचा आहे. श्री समर्थ वासुदेव बाबा हे नेहमीच वैशाख शुद्ध बारसाला त्यांचे गुरू श्री समर्थ रघुनाथ बाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम करतात आपल्या गुरूची पुण्यतिथी सोहळा मी नसतानाही सुरू राहायला पाहिजे म्हणून गुरूच्या पुण्यतिथीच्या दिवशी वासुदेव बाबा चुंचाळे येथे समाधिस्त झाले.असा हा गुरू शिष्य पुण्यतिथीचा सोहळा वासुदेव बाबा दरबारात मोठया उत्साहाने केला जातो.
असा तयार होतो महाप्रसाद !!
एक दिवस अगोदर मंदिर परिसरातील व गावातील महिला पिठ तयार करुन ठेवतात व रात्री आठ वाजेपासून सर्व महिला पुरणपोळी तयार करण्यासाठी मंदिराजवळ येतात.आंब्याचा रस सकाळी मशिनरीद्वारे तयार करण्यात येतो व सोबत मसाली रसी सुद्धा केली जाते.
असा होईल कार्यक्रम !!
दरम्यान गुरू रघुनाथ बाबा व शिष्य वासुदेव बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने उद्या दि.०९ मे २५ शुक्रवार रोजी सकाळी ६ वाजता मारोती अभिषेक,६.३० वाजता श्री समर्थ सुकनाथ बाबा यांच्या मूर्तीला स्नान व मूर्ती अभिषेक तसेच आरती,८.३० पासुन भजन भारूडांचा कार्यक्रम,दुपारी १२ वाजता महाआरती आणि १ वाजेपासुन महाप्रसाद अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी परिसरातील भाविक भक्तांनी या गुरु शिष्य पुण्यतिथी निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन चुंचाळे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.