यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०८ ऑगस्ट २६ शनिवार
येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या आवारात आणि नवकार सिटी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.प्रभारी प्राचार्य डॉ.एस.आर.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात एकूण ५० विविध रोपांची यशस्वी लागवड करण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून यावल येथील पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार वाढवे उपस्थित होते.त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पोलीस उपनिरीक्षक वाढवे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे असणारे महत्त्व विशद करीत “केवळ वृक्षारोपण करून थांबणे पुरेसे नसून लावलेल्या रोपांचे संगोपन आणि जतन करणे ही काळाची गरज आहे” असे प्रतिपादन त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.या उपक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार तसेच उपप्राचार्य डॉ.एच.जी.भंगाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.पी.व्ही.पावरा,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.सी.टी.वसावे,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.रुपाली शिरसाठ,डॉ.आर.डी.पवार,डॉ.बी. सी.पाटील आणि प्रा.अर्जुन गाढे यांनी विशेष परिश्रम घेतले.या प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे एकूण ७० स्वयंसेवक व विद्यार्थी वृक्षारोपणाच्या या हरित मोहिमेत उत्साहाने सहभागी झाले होते.परिसरात हिरवळ वाढवणे आणि निसर्गाचे संरक्षण करणे या उद्देशाने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.