रावेर-पुनखेडा-पातोंडी रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्याच्या आ.अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सक्त सूचना !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ ऑगस्ट २६ रविवार
तालुक्यातील रावेर-पुनखेडा-पातोंडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू असून या कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक ग्रामस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.या तक्रारींची गंभीर दखल घेत रावेर यावल मतदार संघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी संबंधित प्रशासनाला सदर कामाची तात्काळ चौकशी करून कामाची गुणवत्ता तपासण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.

सदर रस्ता हा रावेर व मुक्ताईनगर तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते त्यामुळे रस्त्याचे काम शासनाच्या निर्धारित निकषांनुसार व दर्जेदार पद्धतीने होणे आवश्यक आहे मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.या पार्श्वभूमीवर आमदार अमोल जावळे यांनी मा. कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जळगाव यांना पत्र देऊन रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करण्याच्या सूचना केल्या आहेत.कामाची गुणवत्ता,वापरण्यात आलेले साहित्य,रस्त्याची जाडी,मजबुतीकरणाची प्रक्रिया,डांबरीकरण तसेच इतर तांत्रिक बाबींची सक्षम अधिकाऱ्यामार्फत तपासणी करण्यात यावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.तपासणीमध्ये कामामध्ये काही त्रुटी अथवा गुणवत्तेच्या बाबतीत कमतरता आढळून आल्यास त्याबाबत आवश्यक ती पूर्तता करून घेण्यात यावी.तसेच रस्त्याचे काम शासनाच्या निर्धारित निकषांनुसार व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यात यावे अशा सूचना आमदार जावळे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.जनतेच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे.रस्त्याचे काम दर्जेदार आणि टिकाऊ झाले पाहिजे अशी भूमिका आमदार अमोल जावळे यांनी घेतली आहे.