“…म्हणून तुमची लंगोट तरी वाचली,अन्यथा हिमालयात जावे लागले असते” !! अमोल मिटकरींची रामदास कदमांवर बोचरी टीका
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० जून २४ गुरुवार
शिवसेना पक्षाचा ५८ वा वर्धापन दिन बुधवारी पार पडला.शिवसेनेतील फूटीनंतर दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्यात आले.शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम वरळीत पार पडला.या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबाबत बोलतांना देवेंद्र फडणवीसांना उद्देशून भाष्य केले की,’अजित पवार थोडे दिवस आले नसते तरीही चालले असते’ त्यांच्या या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.अजित पवार हे महायुतीमध्ये वेळेत आले म्हणून तुमची लंगोट वाचली,अन्यथा हिमालयात जावे लागले असते असा टोला अमोल मिटकरींनी रामदास कदमांना लगावला आहे.रामदास कदमजी आपण जोरात बोललात की,मागून आलेले अजितदादा थोडे उशिरा आले असते तर बरे झाले असते माहिती साठी सांगतो ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली व उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावे लागले असते.दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना पक्षाचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच अजित पवार गटाबाबत मोठे भाष्य केले.रामदास कदम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले,“फडणवीस साहेब धन्यवाद.मात्र अजित पवार थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चालले असते.” अशा शब्दात रामदास कदम यांनी अजित पवार गट महायुतीत आल्याने अशा पद्धतीने नाराजी त्यांनी बोलून दाखवल्याने चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान त्यांच्या या विधानानंतर अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया आता येत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरू होण्याची शक्यता आहे.तर शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटावर हल्लाबोल करतांना म्हटले होते की,शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली.काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपण्यासाठी दोन वर्षापूर्वी आपण उठाव केला तो उठाव योग्य होता हे या निवडणुकीमध्ये जनतेने दाखले.आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता हे आपण निवडणुकीमध्ये पाहिले.जनतेच्या विश्वासाला आपण कधाही तडा जाऊ देणार नाही हा शब्द मी देतो असे एकनाथ शिंदे म्हणाले.