यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ जुलै २६ बुधवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी ज्यु.कॉलेजमध्ये आज दि.२९ जुलै २६ बुधवार रोजी पालक सभा मोठ्या उत्साहात पार पडली.सदरील सभेचे आयोजन शिक्षक,पालक व विद्यार्थी यांचा समन्वय साधण्यात यावा व शिक्षक,पालक व विद्यार्थी यांच्या समस्या व सूचना समजून घेऊन त्यावर काय तोडगा काढता येईल? अशा विषयांवर चर्चा करण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी “पोलीस नायक” चे मुख्य संपादक व शाळेचे माजी विद्यार्थी बाळासाहेब आढाळे हे होते.प्रसंगी सभेचे अध्यक्ष बाळासाहेब आढाळे यांचे शाळेचे मुख्याध्यापक नितीन झांबरे तर उपस्थित पालकांचे उपशिक्षिका शुभांगिनी पाटील यांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक चेतन चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार उपशिक्षिका सोनाली फेगडे यांनी केले.

सदरील कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपशिक्षक चेतन चौधरी यांनी शाळेचे लहान रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होऊ पहात असल्याची महती पटवून देतांना त्यांनी शाळेत करण्यात आलेल्या विविध विकासाची माहिती विशद केली तसेच अँक्टिव्हिटी बेस लर्निंग अर्थात कृतीयुक्त गणिती प्रयोगशाळा व कल्पकतेचे कपाट या शाळेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजनेबाबत माहिती दिली.तर मुख्याध्यापक नितीन झांबरे यांनी विद्यार्थ्यांच्या विकासाचा ध्यास हेच आपले ब्रीद असून विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्यास सर्वात आधी स्थान राहील हे सांगतांना त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवून त्यांचा विकास करण्यासाठी आपण अहोरात्र कटिबद्ध असल्याचे नमूद केले.तसेच नितीन झांबरे यांनी शाळेत मागील वर्षांपासून सेमी इंग्लिश माध्यमाला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती सांगतांना सोबत शाळेच्या वतीने करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या विविध सुख-सोयी व सुधारणा यावर प्रकाश टाकला.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब आढाळे यांनी शाळेत करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांबाबत समाधान व्यक्त करीत या शाळेने डॉक्टर,वकील,इंजिनिअर व मोठमोठे व्यावसायिक बनविले असून गावातील प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांना इंग्लिश माध्यमातील शाळांमध्ये शिकविण्याचा हट्टाहास सोडून तसेच वारेमाप फी भरण्यापेक्षा ‘आपले गाव आपली शाळा’ या माध्यमातून इंग्लिश माध्यमाच्या धर्तीवर फ्री मध्ये शिक्षण देणाऱ्या आपल्या गावातील शाळेतच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यावा असे आवाहन केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नितीन झांबरे,उपशिक्षक एन व्ही वळींकर,चेतन चौधरी,पी पी कुयटे,विवेक कुलट,मनीषा तडवी,शुभांगिनी पाटील,सोनाली फेगडे,नयना पाटील,शुभेच्छा अहिरे,पालक बाळासाहेब आढाळे,शेकलाल तडवी,अतुल आढाळे,नरहर आढाळे,आनंद तायडे,उषा जावळे,प्रियंका चव्हाण,सुमन मेघे इत्यादी उपस्थित होते.