आंतरवली सराटी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ जून २४ बुधवार
राज्य सरकारसमोरचा मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप कायम असून सगे-सोयऱ्यांच्या अंमलबजावणीवर मनोज जरांगे ठाम आहेत व त्यांनी सरकारला यासाठी १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे.त्यांनी यासाठी उपोषणही सुरु केले होते तर लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षणासाठी उपोषण सुरु केले.त्यानंतर आता मनोज जरांगेंनी भुजबळांवर जोरदार टीका केली आहे.’बेट्या तुझा टांगा पलटी करणार’ असे म्हणत पुन्हा एकदा भुजबळांवर एकेरी भाषेत टीका केली आहे.आता तुम्ही पलट्या मारायला लागले आहेत.मी पहिल्यापासून सांगतोय आमच्या व्याख्येप्रमाणे आरक्षण द्या.आधी ठीक आहे सांगतात,सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणी करा नाहीतर करु नका.तुम्ही जर पलट्या मारल्या तर तुमचे सरकार मी पलटी केलेच म्हणून समजा असा इशाराच मनोज जरांगेंनी दिला आहे.छगनभाऊ,तुला असा इंगा दाखवतो,तू आमच्या आमच्यात काडी लावतो का ? मी तुझ्यापेक्षा जास्त पुढचा आहे.तू बळच रक्त जाळतो आहेस.बेट्या तुझा टांगा उलटवणार.तू जेवढे करशील तेवढा मराठा एक होत जाईल असे म्हणत भुजबळांवर मनोज जरांगेंनी पुन्हा टीका केली आहे.
कोणता तरी नेता सांगतोय म्हणून आपण बिघडायचे आणि रोष व्यक्त करायचा.आपल्याला एकमेकांचे चेहरे बघायचे आहेत,रामराम घालायचा आहे,शेतात एकमेकांना काही अडचण आली तर मदतीला जायचे आहे याच भूमिकेत आपल्याला राहायचे आहे असे आवाहन तुम्ही आमची भूमिका समजून घ्या,आम्ही १५० वर्षांपासून आरक्षणात आहोत पण आम्हाला हे माहिती नव्हते की आम्ही आहोत.आता आम्हाला माहिती झाले आहे त्यामुळे नोंदी पाहून तुम्हीही म्हटले पाहिजे की द्या मराठा समाजाला आरक्षण असेही मनोज जरांगे म्हणाले.मनोज जरांगेंनी राज्य सरकारला सगे सोयऱ्यांसह मराठा समाजाच्या आरक्षणासाठी १३ जुलैपर्यंत मुदत दिली आहे व त्याबाबतही त्यांनी भाष्य केले असून मनोज जरांगे म्हणाले,१३ जुलैनंतर सरकारचे काहीही ऐकून घेणार नाही असे त्यांनी म्हटले.तुम्ही पलट्या मारल्या तर तुमचे सरकार म्या पलटी केलच समजायचे हे इतके दिवस बोललो नव्हतो पण आता बोलणे आवश्यक आहे असेही मनोज जरांगेंनी म्हटले आहे.उपोषणानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे आज अंतरवाली सराटी गावात आले त्यावेळी गावकऱ्यांना उद्देशून भाषण केले.मी अंतरवलीत येण्यासाठी आसूसलेलो होतो,मरणाच्या शेवटच्या घटकासोबत मी समाजासोबतच राहणार असल्याचेही जरांगेंनी पुन्हा एकदा म्हटले आहे.