मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ नोव्हेंबर २४ मंगळवार
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला पार पडली आणि त्यानंतर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाले.२३ नोव्हेंबरच्या निकालात महायुतीला २३९ जागा मिळाल्या आहेत.यानंतर या निकालांमध्ये काहीतरी गडबड आहे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.जितेंद्र आव्हाड यांनी संख्येबाबत सविस्तर पोस्ट लिहून फरक विचारला आहे तर दुसरीकडे एका माजी आमदाराने विधानसभा निवडणूक निकाल ईव्हीएम घोटाळायुक्त आहे असा आरोप केला आहे.
महायुतीतल्या कुठल्या पक्षांना किती मते मिळाली
भाजपा -१३२ आमदार
शिवसेना (एकनाथ शिंदे)-५७ आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)-४१ आमदार
मित्रपक्ष -९ आमदार
अशा एकूण २३९ जागा महायुतीला मिळाल्या आहेत यामुळे राज्यात महायुतीचे सरकार येणार हे स्पष्ट आहे.दरम्यान कन्नड विधानसभेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी ही निवडणूक आणि निकाल ईव्हीएम घोटाळा युक्त असल्याचे म्हटले आहे.कन्नडची निवडणूक आणि त्या ठिकाणी झालेली मतमोजणी याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत तसेच प्रश्न या मतदार संघातही आहेत.ईव्हीएम संदर्भातल्या प्रश्नांसाठी मी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली.येत्या काळात ईव्हीएमच्या संदर्भात अनेक गोष्टी आगामी काळात समोर येतील कारण अनेक गोष्टी या मानवी चुका झाल्या आहेत म्हणून समोर येत आहेत.आमचे लिहितांना चुकले आणि दुरुस्त केले हे पुढे येत आहे.मतदानाच्या दिवशी मोजणी सुरु असतांना जी आकडेवारी पत्रकारांना देण्यात आली ती नेमकी वाढली कशी ? त्यावर हे उत्तर देण्यात आले की सुरुवातीच्या संख्या चुकल्या होत्या आणि आम्ही त्या आता दुरुस्त केल्या.निवडणूक आयोगाकडून संख्या देताना इतका हलगर्जीपणा कसा होतो ? हा पोरखेळ झाला आहे असे हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे.
ईव्हीएम घोटाळायुक्त निवडणूक आणि निकाल
येत्या काही दिवसांमध्ये राज्यात हे प्रश्न चर्चेत येतील.ही निवडणूक आणि निकाल ईव्हीएम घोटाळा युक्त असलेली निवडणूक आहे.ह्युमन एररचे कारण सांगितले जात आहे जे असू शकत नाही कारण हा निवडणूक आयोग आहे.चौपाटीवर बसून चूक झाली असे सांगण्यात येण्याइतके सोपे नाही.घोटाळा कुठे झाला हे शोधावे लागेल. ईव्हीएम घोटाळ्यांनी युक्त निवडणूक असल्याने ही निवडणूक रद्द करण्यात यावी व बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे ही माझी मागणी आहे असेही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे.