मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ मार्च २५ गुरुवार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच प्रार्थनास्थळांवर लाऊडस्पीकरसाठी ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.याबाबत बोलतांना फडणवीस यांनी केंद्र सरकार आणि न्यायालयांच्या आदेशांचे दाखले देत मार्गदर्शक नियमांचे काटेकोरपणे पालन करावी लागेल असे म्हटले होते.यानंतर माजी मंत्री आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘माईक आणि लाऊडस्पिकरचे नियम’ दाखवून कोळीवाड्यातल्या उत्सवावर विरजण घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोप केला आहे.याचबरोबर त्यांनी,“महाराष्ट्र सरकारचे डोके ठिकाणावर आहे का” ? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.आज एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की “महाराष्ट्र सरकारचे डोके ठिकाणावर आहे का”? आधीच आमच्या गणेश मंडळांना विविध नियमांमध्ये अडकवून आणि विसर्जनाचा प्रश्न प्रलंबित ठेवून छळले जात आहे आणि आता कोळीबांधवांसाठीच नाही तर सर्व हिंदू धर्मीयांसाठी महत्वाच्या असलेल्या होळी सणाच्या वेळी ‘माईक आणि लाऊडस्पिकरचे नियम’ दाखवून माझ्या वरळी मतदारसंघातल्या कोळीवाड्यातल्या उत्सवावर विरजण घालण्याचे काम सुरु आहे.आपल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की,“या सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस का आहे ? ‘चुनावी हिंदुत्व राबवायचे आणि सत्तेत आल्यावर मात्र मराठी सणांवर बंधने घालायची’, ही कसली निती” ? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेत मशिदींमधील लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित केला होता.लाऊडस्पीकरमुळे होणारे ध्वनी प्रदूषण धोकादायक बनले आहे.मशिदींमध्ये लाऊडस्पीकर वाजतात ज्यामुळे लोकांना त्रास होतो ते खूप मोठ्या आवाजात असतात असे त्या म्हणाल्या होत्या.नियमांचे उल्लंघन करून लाऊडस्पीकरचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की,“केंद्र सरकार आणि न्यायालयाच्या आदेशानुसार प्रार्थनास्थळांवर लाऊडस्पीकरसाठी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करू नये.सकाळी लाऊडस्पीकरसाठी परवानगी असलेली आवाजाची मर्यादा ५५ डेसिबल तर रात्री ती ४५ डेसिबल आहे”.