जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२२ सप्टेंबर सोमवार
भडगाव शहरात रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून काही घरांना व मालमत्तेला किरकोळ नुकसान झाले आहे.नीचांगी भागांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती वस्तू,भाजीपाला तसेच किराणा साहित्याचे नुकसान झाले आहे.
दरम्यान शहरातील काही ठिकाणी मातीच्या घरांचे पडझड झाल्याची माहिती मिळाली असली तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.जुना पारोळा रस्ता लगतच्या गाड्यांमध्ये पाणी साचल्याने एडवोकेट निलेश तिवारी,एडवोकेट रणजीत पाटील तसेच ईगल सायकल मार्ट परिसरात तळ मजल्यातील पाणी उपसण्यासाठी पंपिंगचे काम सुरू आहे.स्थानिक प्रशासनाने प्रभावित कुटुंबांना तातडीने मदत पुरविण्याचे आश्वासन दिले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान तालुक्यात रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.शहरातून वाहणारा कोल्हा नाला धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने आसपासच्या सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होत आहे.संततधार पावसामुळे लहान-मोठे नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्याने पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचा कडक इशारा दिला आहे तसेच पशुधन सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आणि नदी-नाल्यांच्या काठावर पाणी पाहण्यासाठी गर्दी न करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरपंच,पोलीस पाटील,तलाठी,ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.कोणतेही नुकसान,धोकादायक स्थिती किंवा दुर्घटना घडल्यास तात्काळ प्रशासनाला कळविण्याचे निर्देश दिले आहेत.शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत.‘सुरक्षितता प्रथम’ या संदेशासह प्रशासनाने नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचे आणि अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.