शिक्षक हितासाठी कार्य करणाऱ्या अनुभवी नेतृत्वावर विश्वास ठेवत सेवानिवृत्ती नंतरही एस.डी.भिरुड यांच्याकडे शिक्षक पतपेढीच्या तज्ञ शिक्षक पदाची जबाबदारी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ ऑक्टोबर २५ शुक्रवार
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ निस्वार्थीपणे काम करणारे आणि पतपेढीच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणारे एस.डी.भिरुड हे सेवानिवृत्ती नंतरही शिक्षक हितासाठी कार्यरत राहणार आहेत.जळगाव जिल्हा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या संचालक मंडळाने त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखवत त्यांची “तज्ञ संचालक” म्हणून बिनविरोध निवड केली आहे.या निवडीचा आनंद साजरा करण्यासाठी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात तालुकास्तरीय भव्य सत्कार सोहळा उत्साहात आयोजित करण्यात आला.अकरा वर्षांच्या अध्यक्षीय कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरी एस.डी.भिरुड हे सलग अकरा वर्षे पतपेढीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते व त्यांच्या कार्यकाळात पतपेढीने उल्लेखनीय प्रगती साधली.त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात सभासद व त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी भव्य इमारत उभारण्यात आली ज्यामुळे शिक्षकांच्या कुटुंबीयांना शहरात शिक्षणासाठी स्थिर व सुरक्षित वातावरण उपलब्ध झाले.पूरग्रस्तांना मदतीचा हात देत भिरुड सरांच्या मार्गदर्शनाखाली पतपेढी कडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल ११ लाख रुपयांची देणगी देण्यात आली व हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात आदर्श ठरला.पारदर्शक कारभार,शिस्तबद्ध आर्थिक धोरणे आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन हे त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
सदर सन्मान सोहळा जळगाव पतपेढीचे संचालक सिद्धेश्वर वाघुळदे व भुसावल पतपेढीचे सचिव चेतन तळेले यांच्या पुढाकाराने करण्यात आला.कार्यक्रमात विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी,पतसंस्थांचे अधिकारी व तालुक्यातील मान्यवर शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पप्पू वानखेडे विकास विद्यालय,सातोद यांनी केले.मनोगत विजय नन्नवरे साने गुरुजी विद्यालय,सिद्धेश्वर वाघुळदे जळगाव पतपेढी आणि ललित सुपे नवी विद्यालय यांनी व्यक्त केले.आभार प्रदर्शन चेतन तळेले यांनी मानले.कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून भुसावल पतपेढीचे माजी अध्यक्ष डी.ए.पाटील,ललित सुपे,कलाध्यापक संघाचे अध्यक्ष अरुण सपकाळे,राजेंद्र भारंबे,भुसावल पतपेढीचे अध्यक्ष गोपाळ महाजन,यावल पतपेढीचे अध्यक्ष किरण झांबरे,संचालक प्रशांत सोनवणे,गुळवे सर,दहिगाव हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक मनु महाजन,मारुळ हायस्कूलचे मुख्याध्यापक अश्फाक सर,खेडकर सर,निलेश पाटील,सोपान महाजन,दीपक बारी,यावल पतपेढीचे सचिव आतिश मेघे,पत्रकार सुधीर चौधरी,योगेश कोळी यांच्यासह अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.