यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०७ नोव्हेंबर २५ शुक्रवार
तालुक्यातील दहिगाव येथे लवकरच कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारतळ होणार असून शेतजमिन भाडेतत्वावर घेण्याचा करारनामा नुकताच करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे यांनी दिली आहे.
तालुक्यातील दहिगाव येथे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने शेतमालाचे लिलाव व्हावेत व खेडा खरेदीत होणाऱ्या फसवणुकीस आळा बसावा यासाठी बाजार समितीने मौजे दहिगाव शिवारातील गट नं. २१८ क्षेत्र हे.१.२९.०० ही शेतजमिन भाडेतत्वावर घेतली असून ५ वर्षांच्या मुदतीसाठी करारनामा नोंदणीकृत करण्यात आलेला आहे.बाजारतळ स्थापनेसाठी शासनाच्या मंजुरीस्तव प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आलेला असून मंजुरी मिळताच सदरील ठिकाणी शेतमालाचे लिलाव सुरू केले जातील अशी माहिती सभापती राकेश वसंत फेगडे यांनी दिली आहे.शेतकऱ्यांच्या अनेक दिवसांच्या मागणीस बाजार समितीकडून तत्पर प्रतिसाद मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.