डोंगर कठोरा येथील भिरूड वाड्यात पावसाच्या सुरुवातीलाच तलावाची परिस्थिती !! गावकऱ्यांच्या मागणीनंतरही प्रशासकांचे दुर्लक्ष !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ जून २६ रविवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे गेल्या सात-आठ दिवसापासून पावसाने सुरुवात केली असून मधून-मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.सदरहू या जोरदार सरींमुळे भिरूड गल्ली भागातील मुख्य रस्त्यावरील रहिवाशी रेवानंद भिरूड व विलास भिरूड यांच्या घराजवळ तलावाप्रमाणे पाणी साचत असल्यामुळे रहिवाशांना व या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना या साचलेल्या पाण्याचा सामना करून त्यातूनच मार्गक्रमण करावे लागत आहे.याबाबत परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच तथा प्रशासक नवाज तडवी यांना सदरील समस्येबाबत आपली व्यथा मांडल्यानंतर त्यांच्याकडून रेती टाकून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सदरहू काल दि.२७ जून शनिवार रोजी पावसाच्या जोरदार सरी बरसल्यामुळे पुन्हा याठिकाणी तलावाची परिस्थिती निर्माण झाली असून येथील रहिवाशी रेवानंद भिरूड व विलास भिरूड यांच्या घरांच्या पायऱ्यांपर्यंत पाणी जमा झालेले आहे.परिणामी सदरील परिवारांना घराच्या बाहेर पडणे फारच जिकरीचे झाले आहे.हीच परिस्थिती या मुख्य रस्त्यावरून पायी व वाहनाने ये-जा करणाऱ्या गावकऱ्यांची झाली आहे.पावसाळ्यापूर्वीच ही परिस्थिती तर ऐन पावसाळ्यात काय परिस्थिती राहील ? असा प्रश्न गावकऱ्यांच्या वतीने उपस्थित केला जात असून प्रशासकाच्या वतीने याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे.दरम्यान ग्रामपंचायत सरपंच तथा प्रशासक नवाज तडवी यांच्याकडून केवळ रेती टाकून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून सदरील रेतीची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यात आली नसल्याने आमची समस्या कायम असल्याचे गावकऱ्यांच्या वतीने सांगितले जात आहे.तरी प्रशासक नवाज तडवी यांनी लक्ष पुरवून ही समस्या तात्काळ सोडवावी अशी मागणी रहिवाशी रेवानंद भिरूड व विलास भिरूड तसेच ग्रामस्थांनी केली आहे.