सन २०२४-२५ पर्यंत टी.ई.टी.उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे नाव पवित्र पोर्टलमध्ये समाविष्ट करण्यात यावे !! महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्ष शुभांगीताई पाटील यांची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी !!
पप्पू ठाकूर,पोलीस नायक
धुळे जिल्हा (प्रतिनिधी)
दि.११ ऑगस्ट २६ मंगळावर
राज्यात शिक्षक भरतीत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाकडून शिक्षक भरतीसाठी तयार करण्यात आलेल्या शासनाच्या पवित्र पोर्टल प्रणाली मध्ये सन २०२४ पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी.ई.टी.परीक्षा उत्तीर्ण झालेल्या डी.एड,बी.एड पात्रताधारक विद्यार्थ्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले होते.परंतु त्यानंतर सन २०२४-२५ नंतर झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव या प्रणालीत समाविष्ट करण्यात आलेले नाही.सदरहू नाव समाविष्ट करण्यासाठी उपलब्ध असलेल्या टॅब बंद असल्याने सन २०२४-२५ नंतर आजपर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी.ई.टी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे पात्र असून देखील त्यांच्या नोकरीच्या हक्कापासून वंचित राहत आहेत.
तसेच सध्या शासनाच्या विविध विभागाच्या तसेच खाजगी संस्थांच्या शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून सदर विद्यार्थी पवित्र पोर्टलमध्ये समाविष्ट नसल्यामुळे ते या शिक्षक पद भरतीपासून वंचित राहत आहेत.याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी शिवसेनेच्या राज्य उपनेत्या तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्याकडे आपली व्यथा मांडली.सदरहू या गोष्टीची तात्काळ दाखल घेत शुभांगी ताई पाटील यांनी नुकतेच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.ना.दादाजी भुसे यांना याबाबत निवेदन देत सन २०२४-२५ नंतर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या डी.एड,बी.एड पात्रता धारक विद्यार्थ्यांचे नाव तात्काळ पवित्र प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.याबाबत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी देखील शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना याबाबत कारवाई करण्याची निर्देश दिले आहेत.