भाऊ बहिणीच्या जिव्हाळयाचा अतूट प्रेमाचे बंधन साजरे करण्यास पोस्ट ऑफिस सज्ज !! रक्षाबंधननिमित्ताने पोस्ट ऑफिसची पार्सल योजनेची भेट !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.११ ऑगस्ट २६ मंगळवार
रक्षाबंधन म्हणजेच भाऊ-बहिणीच्या अतूट पवित्र प्रेमाचा,जिव्हाळ्याचा आणि जन्मोजन्मीच्या नात्याचा भावनिक बंध आहे.बहिणीच्या हातून भावाच्या मनगटावर बांधली जाणारी राखी म्हणजे प्रेम,माया आणि आशीर्वादाची अनमोल भावना.मात्र शिक्षण,नोकरी,व्यवसाय अथवा विविध कारणांमुळे भाऊ बाहेरगावी लांब किंवा परदेशात असतांना या पवित्र नात्याच्या भावनांना अंतराची अडचण निर्माण होते.याच भावनिक अंतरावर आता भारतीय डाक विभागाने प्रेमाचा सेतू उभारला आहे. परदेशात असलेल्या भावाच्या मनगटावर बहिणीने प्रेमाने आणि चोखंदळपणे निवडलेली राखी सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी भुसावळ विभागातील सर्व पोस्ट ऑफिस सज्ज झाले आहेत.
दरम्यान स्पीड पोस्टच्या माध्यमातून आपल्या देशात वजन ५० ग्रॅमपर्यंत फक्त ५५/-रुपये तर परदेशात २३६ रुपयांपासून परदेशातील आपल्या भावापर्यंत राखी पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.विशेष म्हणजे जगातील तब्बल १३७ देशांमध्ये साधारणतः ७ ते १२ दिवसांच्या कालावधीत राखी पोहोचविण्याची सुविधा पोस्ट ऑफिसमार्फत उपलब्ध आहे.तसेच आतून प्लास्टिक कोटिंग असलेले खास रक्षा बंधन पाकीट विक्रीसाठी उपलब्ध असून या वर्षीचे रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर आले आहे.बहिणीच्या मनात भावाच्या मनगटावर राखी बांधण्याची ओढ असते मात्र भाऊ हजारो किलोमीटर दूर परदेशात असल्याने प्रत्यक्ष भेट शक्य होत नाही.अशावेळी बहिणीने प्रेमाने बांधलेली राखी पोस्टाच्या माध्यमातून भावापर्यंत पोहोचणे म्हणजे अंतर कितीही असले तरी नात्यातील प्रेम कायम जवळ असल्याची सुंदर अनुभूती आहे.”अंतर कितीही असो बहिणीचे प्रेम भावाच्या मनगटापर्यंत पोहोचणार” या भावनेने पोस्ट ऑफिसने ही विशेष सेवा उपलब्ध करून दिली आहे.पोस्ट विभाग ही केवळ पत्रे किंवा पार्सल पोहोचविणारी यंत्रणा नसून माणसामाणसांमधील भावना आणि नाती जोडण्याचे काम करतो त्यामुळे भगिनींनी निश्चितपणे पोस्ट ऑफिसच्या या सुविधेचा लाभ घ्यावा.तसेच राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी भेटवस्तू देत असतो त्यात मिठाई,विविध भेटवस्तू किंवा सर्वात सोपे म्हणजे रोख रक्कम असते हे सर्व पारंपरिक प्रकार आता जुने झाले आहेत.तरी या डिजिटल युगात आपण पोस्ट ऑफिसमार्फत जीवन विमा किंवा पीपीएफचे खाते उघडून देऊन अनमोल उपहार व भेट रूपात देऊ शकतो.अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क करावा असे आवाहन डाक अधीक्षक मनीष नवलु यांनी केले आहे.