भुसावळ येथे पुजाऱ्याची डोक्यात वार करून हत्या !! कालिका माता मंदिर परिसरात रक्तरंजित थराराने भुसावळ हादरले !!
जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ जून २६ सोमवार
भुसावळ येथील शहरालगत असलेल्या मिलिटरी स्टेशन कॅम्पसच्या मागील बाजूस आणि झेडटीआरआय बोगद्याजवळ असलेल्या कालिका माता मंदिराच्या पुजाऱ्याचा अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात जड व टणक वस्तूने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज दि.२९ जून सोमवार रोजी सकाळी उघडकीस आली आहे. सदरहू या घटनेमुळे संपूर्ण भुसावळ शहरासह रेल्वे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.संतोष रघुवीर मंचल वय ५५ असे मृत पुजाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,भुसावळ ते खंडवा डाऊन रेल्वे मार्गालगत असलेल्या कालिका माता मंदिराच्या आवारात संतोष मंचल हे गेल्या सहा ते सात वर्षांपासून वास्तव्यास होते व मंदिर परिसरातील एका पत्र्याच्या खोलीत ते राहात असून तेथील तीन मंदिरांची स्वच्छता,देखभाल तसेच नित्य पूजा-अर्चेची जबाबदारी ते
सांभाळत होते तसेच ते केवळ जेवणासाठी घरी जात असत.आज दि.२९ जून सोमवार रोजी सकाळी सुमारे दहा वाजेच्या सुमारास एक भाविक नेहमीप्रमाणे मंदिरात दर्शन व पूजेसाठी गेला असता मंदिरालगतच्या पत्र्याच्या खोलीजवळ संतोष मंचल हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले.प्रसंगी त्यांच्या डोक्यावर कोणत्यातरी जड वस्तूने जबर प्रहार करण्यात आल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला होता.सदरहू ही बाब लक्षात येताच संबंधित व्यक्तीने तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.सदर घटनेची माहिती मिळताच संतोष मंचल यांच्या कुटुंबीयांनी मंदिर परिसरात धाव घेतली व रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.या हृदयद्रावक प्रसंगामुळे परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.दरम्यान मृत संतोष मंचल यांना दररोज मद्यपान करण्याचे व्यसन होते व या कारणावरून घरामध्ये अनेकदा वाद होत असल्याची माहिती त्यांच्या दोन्ही मुलांनी पोलिसांना दिली आहे.या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास केला जात असून हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून पंचनामा केला व त्यानंतर मृतदेह उत्तरीय
तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.स्थानिक गुन्हे शाखेसह भुसावळ शहर पोलीस या हत्येचा तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे तसेच संशयित व्यक्तींची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत करण्यात आली आहेत परिणामी लवकरच या हत्येचा उलगडा होईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.