पर्यावरण संवर्धनासाठी यावल तहसील कार्यालयाच्या पुढाकारातून विविध वनौषधी व पक्षीमित्र वृक्षांचे वृक्षारोपण !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.९ जुलै २६ गुरुवार
पर्यावरण संरक्षणाची जनजागृती आणि हरित परिसर निर्मितीच्या उद्देशाने यावल तहसील कार्यालयाच्या आवारात आज दि.९ जुलै गुरुवार रोजी वृक्षारोपण व श्रमदानाचा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते पर्यावरणाचा समतोल राखणारे तसेच पक्षी व जैवविविधतेसाठी उपयुक्त असलेले पिंपळ,जांभूळ,अर्जुन,बेहडा आणि कडुनिंब अशा २२ वनौषधी वृक्षांचे रोपण करण्यात आले.यावेळी उपस्थितांना “एक झाड प्रत्येकाने लावा,पर्यावरण वाचवा” हा संदेश देत वृक्षसंवर्धनाची शपथ देण्यात आली.
दरम्यान तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी आपल्या मार्गदर्शनात वाढते तापमान,बदलते हवामान आणि घटते हरित क्षेत्र लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणासोबतच झाडांचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने दरवर्षी किमान एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प करावा असे आवाहन त्यांनी केले.या उपक्रमासाठी बामणोद मंडळाचे मंडळ अधिकारी दीपक गवई यांनी पुढाकार घेत वन विभागाच्या माध्यमातून आवश्यक रोपांची उपलब्धता करून दिली व त्यांच्या या प्रयत्नामुळे उपक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.वृक्षारोपणानंतर सर्व मंडळ अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छता आणि वृक्षसंवर्धनाच्या कामात सक्रिय सहभाग घेतला.सामूहिक सहभागातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.उपस्थितांना वृक्षांची नियमित देखभाल,पाणी देणे,संरक्षण करणे आणि त्यांचे संवर्धन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.तसेच “झाडे लावा,झाडे जगवा” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.शासनाच्या पर्यावरणपूरक उपक्रमांना यावल तहसील कार्यालयाने कृतीतून बळ दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.भविष्यातही अशा हरित उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.या प्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,नायब तहसीलदार गांगुर्डे, बामणोद मंडळाचे मंडळ अधिकारी दीपक गवई,सर्व मंडळ अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी तसेच यावल तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.