Just another WordPress site

“सरकारी शुल्क वेगळे… मग ‘अतिरिक्त पैसे’ कशासाठी ? माळेगाव तलाठी कार्यालयातील कथित वसुलीवर नागरिकांचा संताप !! ओळखपत्राविना व्यक्ती तलाठ्याच्या शेजारी बसून पैसे मागत असल्याचा आरोप !!

सनी पटेल,पोलीस नायक

पुणे जिल्हा विभागीय प्रमुख

दि.०८ जुलै २६ बुधवार

माळेगाव तलाठी कार्यालयात सातबारा,फेरफार उतारे आणि इतर महसुली कागदपत्रांसाठी शासनाने निश्चित केलेले शुल्क भरूनही नागरिकांकडून अतिरिक्त पैशांची मागणी केली जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.विशेष म्हणजे कार्यालयात कोतवाल म्हणून काम करणारी व्यक्ती कोणतेही अधिकृत ओळखपत्र (आयडेंटी कार्ड) गळ्यात न घालता थेट तलाठ्याच्या शेजारी बसून नागरिकांकडून पैशांची मागणी करत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.त्यामुळे संबंधित व्यक्तीची अधिकृत भूमिका काय आहे आणि नागरिकांकडून पैसे मागण्याचा अधिकार त्यांना नेमका कोणत्या नियमांनुसार देण्यात आला आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार,स्वतःच्या घराचा सातबारा उतारा काढण्यासाठी ते माळेगाव तलाठी कार्यालयात गेले होते.शासनाने निश्चित केलेली ऑनलाइन फी भरण्याची तयारी त्यांनी दर्शविली मात्र तेथे उपस्थित असलेल्या कोतवाल म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने शासकीय शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.अतिरिक्त रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर मोठ्या आवाजात बोलणे,दबावाचे वातावरण निर्माण करणे आणि काम मुद्दाम लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदाराने आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे व त्यांच्या म्हणण्यानुसार,संबंधित व्यक्तीच्या गळ्यात कोणतेही अधिकृत ओळखपत्र नव्हते तरीही ती व्यक्ती तलाठ्याच्या अगदी शेजारी बसून नागरिकांशी व्यवहार करत होती आणि पैशांबाबत चर्चा करत होती त्यामुळे कार्यालयात नेमकी कोणाची जबाबदारी काय आहे ? नागरिकांनी पैसे कोणाकडे भरायचे आणि अधिकृत कर्मचारी कोण ? याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

महसूल विभागाने नागरिकांना पारदर्शक सेवा देण्यासाठी ऑनलाइन प्रणाली सुरू केली आहे.सातबारा,फेरफार आणि इतर महसुली सेवांसाठी शासनाने निश्चित शुल्क जाहीर केलेले असताना अतिरिक्त पैशांची मागणी होत असल्याचे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे मानले जात आहेत व अशा प्रकारांमुळे शासनाच्या पारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.संबंधित व्यक्तीची अधिकृत नियुक्ती,त्यांचे अधिकार,ओळखपत्र नसताना नागरिकांशी व्यवहार का केला जात होता.कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच अतिरिक्त पैशांची मागणी झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे अशी मागणी होत आहे.

जर या आरोपांमध्ये तथ्य आढळले तर संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी आणि भविष्यात कोणत्याही नागरिकाला सरकारी कार्यालयात अशा प्रकारचा अनुभव येऊ नये व यासाठी महसूल विभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.