यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
आपल्या एक वर्षाच्या लहान बाळाला भेटायला जाण्याची शेवटची ईच्छा आपल्या मित्राकडे मोबाइलवरून व्यक्त करीत एका विवाहित आदीवासी तरूणाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची दुदैवी घटना नुकतीच घडली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,यावल सातोद रस्त्यावरील सुनिल भाऊसाहेब भोईटे यांच्या गट क्रमांक २४२ मधील शेतातील विहीरीत दि.१५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आवेश दगडु तडवी वय ३० वर्षे राहणार बिडगाव मोहरद तालुका चोपडा ह.मु.यावल या विवाहीत आदिवासी तरुणाने आपल्या मुलाला भेटण्याकरिता जायचे आहे असे मित्राला मोबाइलवरून सांगीतले व विहीरीत उडी घेत पाण्यात बुडुन आत्महत्या केली.सदरील विहीरी जवळील रस्त्याच्या कडेला उभी असलेली मोटरसायकल व विहीरीच्या काठावर पडलेल्या चप्पलवरून सदरील विवाहीत तरूणाने विहीरीत उडी घेत आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.मयत आवेश तडवी यास पत्नी व एक वर्षाचा लहान बाळ आहे.काही दिवसापुर्वी तो सावखेडा सिम तालुका यावल येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात संगणक ऑपरेटर म्हणुन काम करीत होता त्यानंतर तो खाजगीत नागरीकांच्या संगणकीय सुविधा पुरविण्याचे कार्य करीत होता.दरम्यान त्याने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ट होवु शकले नाही.घटनेचे वृत्त कळताच यावल पंचायत समिती गटनेते शेखर सोपान पाटील यांनी घटनास्थळी आपल्या सहकार्यांसह धाव घेत मयताचे प्रेत विहीरीतुन बाहेर काढण्यासाठी तडवी कुटुंबास मदत केली मात्र मागील काही तासांपासुन विहीरीस पाणी अधिक असल्याने मयताचे प्रेत शोधण्यास विलंब होत आहे.पोलीस घटनास्थळी उपस्थित राहून घटनेवर नजर ठेऊन आहेत.