जळगवा आणि रावेर मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात म्हणजेच १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर दोन्ही मतदारसंघातले ईव्हीएम हे स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहेत.दि.२६ मेच्या दिवशी सकाळी ९ ते सकाळी ९ वाजून ४ मिनिटे अशी चार मिनिटे सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद झाला होता.महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली मात्र वीज पुरवठा खंडीत झाला होता त्यामुळे जनरेटर,इन्व्हर्टरवर वीज पुरवठा स्थलांतरित करत असतांना ही चार मिनिटे गेली आणि डिस्प्ले बंद झाला होता असे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे मात्र उन्मेष पाटील यांनी या प्रकरणी धक्कादायक आरोप केला आहे.दरम्यान भाजपाचे पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी स्ट्राँग रुममध्ये फिरत आहेत तसेच जनरेटर बॅक अप घेतांना सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद होणे ही बाब संशयास्पद आहे असे आता उन्मेष पाटील यांनी म्हटले आहे.इतकेच नाही तर त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे.सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद होण्यामागे जे लोक कारणीभूत आहेत अशांवर कारवाई केली गेली पाहिजे असेही उन्मेष पाटील यांनी म्हटले आहे.लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर जवळपास १० दिवसांनी हा प्रकार घडल्याने याची चर्चा जळगावात रंगते आहे तसेच उन्मेष पाटील यांच्या आरोपांनीही खळबळ उडवली आहे.