यावल आगार सहाय्यक वाहतूक अधीक्षक संदीप अडकमोल हे आज ३१ मे रोजी २८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३१ मे २६ रविवार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याची “लालपरी” ही केवळ प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणारी सेवा नसून ग्रामीण महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीचे कार्य करणारी संस्था आहे व या संस्थेच्या प्रगतीसाठी अनेक अधिकारी व कर्मचारी आयुष्यभर निष्ठेने सेवा देत असतात.अशाच एका कर्तव्यदक्ष,प्रामाणिक,शिस्तप्रिय आणि प्रशासनातील लखलखीत हिरा म्हणून ओळख निर्माण करणारे यावल आगाराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक संदीप जगन्नाथ अडकमोल हे आज दि.३१ मे २६ रविवार रोजी तब्बल २८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत.
संदीप अडकमोल यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे कर्तव्य,शिस्त,वेळेचे भान आणि कर्मचाऱ्यांविषयी असलेली आत्मीयता यांचा सुंदर संगम होता.त्यांनी आपल्या सेवाकाळात कधीही कामाला ओझे समजले नाही.एस.टी.च्या हितासाठी काम करणे,कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि प्रशासनाची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडणे हेच जणू त्यांच्या जीवनाचे ध्येय होते.कार्यालयात येताना अंगावर स्वच्छ व नीटनेटका युनिफॉर्म,चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि कामात काटेकोरपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य राहिले.यावल आगारातील चालक-वाहक बंधू आणि भगिनी यांचे ड्युटी नियोजन ही अत्यंत जबाबदारीची बाब असते. कोणत्या कर्मचाऱ्याला कोणत्या मार्गावर पाठवायचे,कोणाची परिस्थिती काय आहे,कोणाच्या अडचणी काय आहेत,कोणाला कर्तव्याची गरज आहे तर कोणाला विश्रांतीची आवश्यकता आहे हे सर्व ते अत्यंत बारकाईने समजून घेत असत.त्यांच्या नियोजनामध्ये प्रशासनाची शिस्त आणि कर्मचाऱ्यांप्रती माणुसकी यांचा सुंदर समतोल दिसून येत असे व त्यामुळेच चालक-वाहक बांधवांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर आणि आत्मीयता होती.
संदीप अडकमोल यांचे काम करण्याचे कौशल्य इतके प्रभावी होते की त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल प्रशासनाने वेळोवेळी घेतली परिणामी त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांना मार्ग तपासणी पथक जळगाव येथे बढती मिळाली होती व त्या ठिकाणीही त्यांनी आपल्या जबाबदारीचा ठसा उमटवला.प्रशासनाच्या नियमांचे पालन करतांना त्यांनी कधीही अन्याय होऊ दिला नाही.योग्य गोष्टींसाठी ठाम राहणे आणि चुकीच्या बाबींना न घाबरता सामोरे जाणे ही त्यांची कार्यशैली अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली.प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या गावात,आपल्या माणसांमध्ये राहून सेवानिवृत्त व्हावे अशी इच्छा असते व संदीप अडकमोल यांच्याही मनात हीच भावना होती.त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे प्रशासन त्यांना सहजपणे सोडण्यास तयार नव्हते पण नियमानुसार त्यांना यावल आगारात सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी येथेही सुरुवातीपासून ते सेवानिवृत्तीपर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे व शिस्तबद्ध पद्धतीने सेवा बजावली.त्यांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले,अनेकांना आधार दिला तर अनेकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला.अधिकारी असूनही त्यांनी कधीही अहंकार बाळगला नाही.साधेपणा,संयम,शांत स्वभाव आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती यामुळे ते सर्वांच्या मनात आपलेपणाचे स्थान निर्माण करू शकले.आज ते सेवानिवृत्त होत असताना यावल आगारातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात त्यांच्या विषयी आदर,प्रेम आणि कृतज्ञतेची भावना आहे.त्यांनी दिलेली सेवा,त्यांची शिस्त,त्यांचे मार्गदर्शन आणि एस.टी.महामंडळाप्रती असलेली निष्ठा कायम स्मरणात राहील.