पाडळसेचे पोलीस पाटील सुरेश खैरनार यांना ‘आदर्श पोलीस पाटील’ पुरस्कार जाहीर !! राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनतर्फे धुळे येथे सन्मानपत्र देऊन गौरव !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०३ ऑगस्ट २६ सोमवार
फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाडळसे गावाचे पोलीस पाटील सुरेश वामन खैरनार यांच्या उल्लेखनीय व उत्कृष्ट सेवेची दखल घेत त्यांना ‘आदर्श पोलीस पाटील’* पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनच्या वतीने काल दि.०२ ऑगस्ट २६ रोजी धुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमात त्यांना हे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
सुरेश खैरनार यांनी पाडळसे गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच शांतता समितीच्या माध्यमातून वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी आणि पोलीस प्रशासन व जनता यांच्यात उत्तम समन्वय साधण्यासाठी नेहमीच तत्परतेने कार्य केले आहे.त्याचबरोबर कोरोना काळ असो किंवा गावातील विविध उत्सव त्यांनी बजावलेली कर्तव्यदक्ष सेवा कौतुकास्पद राहिली आहे.परिणामी त्यांच्या याच सामाजिक बांधिलकीची आणि प्रामाणिक सेवेची दखल घेऊन फाउंडेशनतर्फे हा गौरव करण्यात आला आहे.सदरील पुरस्कार मिळाल्याचे वृत्त समजताच फैजपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी,पाडळसे व परिसरातील नागरिक,लोकप्रतिनिधी आणि मित्र परिवाराकडून सुरेश खैरनार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून या पुरस्कारामुळे पाडळसे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.