माळेगाव पोलीस ठाणे हद्दीत नेमकं सुरू आहे तरी काय ? अवैध प्रकारांच्या चर्चांनी नागरिकांमध्ये संभ्रम !!
सनी पटेल,पोलीस नाईक
पुणे जिल्हा विभागीय प्रमुख
दि.०३ ऑगस्ट २६ सोमवार
माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमध्ये काही कथित अवैध प्रकार सुरू असल्याच्या चर्चा सध्या स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहेत.सांगवी, माळेगाव,माळेगाव खुर्द,कांबळेश्वर,पणदरे आणि ढाकाळे या गावांमध्ये काही अवैध धंदे सुरू असल्याचे नागरिकांकडून बोलले जात असले तरी या बाबत अधिकृत पातळीवर स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार,या संदर्भात अनेक वेळा संबंधित पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या.काहींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतही ही बाब पोहोचवल्याचा दावा केला आहे मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार अपेक्षित प्रमाणात कारवाई होत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत त्यामुळे संबंधित भागात नेमकी परिस्थिती काय आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याचबरोबर माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या काही घटनांबाबत अधिकृत प्रेस नोट नियमितपणे प्रसिद्ध होत नसल्याचाही मुद्दा नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे त्यामुळे अनेक घटनांची माहिती नागरिकांपर्यंत किंवा माध्यमांपर्यंत वेळेवर पोहोचत नसल्याची चर्चा आहे.अधिकृत माहितीच्या अभावामुळे विविध अफवा आणि तर्क-वितर्कांना वाव मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
काही स्थानिकांचे असेही म्हणणे आहे की,किरकोळ स्वरूपातील काही प्रकरणे पोलीस ठाण्याच्या स्तरावरच निकाली निघतात की काय ? असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे मात्र या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही त्यामुळे या सर्व बाबींवर संबंधित विभागाने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी होत आहे.
सांगवी,माळेगाव,कांबळेश्वर,पणदरे आणि ढाकाळे या परिसरात सुरू असलेल्या चर्चांची सत्यता काय आहे ? हे स्पष्ट करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की,जर कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू नसतील तर त्याबाबत अधिकृत माहिती देऊन संभ्रम दूर करावा आणि जर कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास येत असेल तर कायद्यानुसार कठोर कारवाई करून नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करावा.
या संपूर्ण प्रकरणात संबंधित पोलीस प्रशासनाची बाजू समोर येणेही तितकेच महत्त्वाचे आहे.त्यामुळे या विषयावर अधिकृत स्पष्टीकरण मिळाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होऊ शकेल.