मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२५ नोव्हेंबर २४ सोमवार
“कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मी कटाचा बळी ठरलो” असे येथील पराभूत उमेदवार व भाजपा नेते राम शिंदे यांनी म्हटले असून माझा पराभव हा नियोजित कट होता आणि या कटात अजित पवार सहभागी असल्याचा संशय शिंदे यांनी व्यक्त केला आहे.तसेच अजित पवारांनी रोहित पवारांच्या विरोधात सभा घेतली असती तर काय झाले असते ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.पराभवानंतर राम शिंदे म्हणाले,त्यांच्या (पवार कुटुंब) राजकीय सारीपाटात माझा बळी गेला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी भाजपा उमेदवार राम शिंदे यांचा १,२४३ मतांनी पराभव केला आहे.रोहित पवारांना १,२७,६७६ मते मिळाली आहेत तर राम शिंदे यांना १,२६,४४३ मते मिळाली आहेत या पराभवानंतर राम शिंदे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.राम शिंदे म्हणाले,आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेढा येथे एक वक्तव्य केले आहे व त्या वक्तव्यावरून एक गोष्ट लक्षात आली आहे की महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागण्यापूर्वीच त्यांच्यात कौटुंबिक अघोषित करार झाला होता.किंबहुना कर्जत-जामखेडसंदर्भात करार झाला होता.माझ्याविरोधात कट रचला गेला होता आणि मी त्या कटाचा बळी ठरलो आहे.मला आज त्याचा प्रत्यय आला.
राम शिंदे म्हणाले,मी वारंवार महायुतीचा धर्म पाळण्यासंदर्भात वरिष्ठांकडे व अजित पवारांकडे मागणी करत होतो परंतु आज अजित पवार यांनी रोहित पवारांना स्वतःच सांगितले की मी सभेला आलो असतो तर तुझे काय झाले असते ? याचा अर्थ हा नियोजित कट होता आणि त्या कटात माझा बळी गेला आहे.या सगळ्या राजकीय सारीपाटात मी बळी ठरलो आहे.दरम्यान यावेळी राम शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करणार आहात का ? त्यावर शिंदे म्हणाले मला माझ्या वरिष्ठांना,महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांना सुचवायचे आहे की हे सगळे महायुतीसाठी चांगले नाही.माझ्यासाठी तर नाहीच नाही.यावर वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे.दरम्यान आज अजित पवार कराड येथील प्रीतीसंगमावर असतांना त्यांची रोहित पवारांशी भेट झाली यावेळी रोहित पवार त्यांच्या पाया पडले त्यानंतर अजित पवार रोहित पवारांना “शहाण्या थोडक्यात वाचलास” असे म्हणाले.