यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ एप्रिल २५ शुक्रवार
तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीपैकी ६३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत दि.२१ एप्रिल रोजी सोमवार रोजी येथील तहसिल कार्यालयाच्या सभागृहात जाहिर केली जाणार असून संबंधित ग्रामपंचायतीच्या नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान तालुक्यात एकुण ६७ ग्रामपंचायती असून यातील ४ ग्रामपंचायतीचे आरक्षण या पुर्वीच जाहिर झालेले आहे तर उवर्रित ६३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण दि.२१ एप्रिल सोमवार रोजी जाहिर केले जाणार आहे.सातोद रस्त्यावरील तहसिल कार्यालयात सदरील आरक्षण सोडत तहसिलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काढली जाणार आहे. यात एकुण पदांपैकी एक द्वितीयांश पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार असून अनुसूचित जाती महिला,अनुसूचित जमाती महिला,नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला यांचा समावेश आहे.तालुक्यात अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे ८,अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे २१,नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे २,सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे ३२ असे आहे.तर यातुन अनुसूचित जातीच्या महिलांसाठी ४,अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ११,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी १,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी १६ असे एकुण ६३ पैकी ३२ जागा महिलांसाठी आरक्षीत केल्या जाणार असल्याची माहिती तहसिलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दिली आहे.