डोंगर कठोरा मोहाळी शिवारातील शेतकऱ्याची बिबट्यासोबत गळाभेट !! २ बिबट्यांच्या लाईव्ह दर्शनामुळे परिसरात घबराटीचे वातावरण !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ एप्रिल २५ शनिवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील मोहाळी शिवारात दि.२४ एप्रिल गुरुवार रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास शेतकरी मनोहर बळीराम पाटील यांना दोन बिबट्यांचे लाईव्ह दर्शन झाले असून त्यांच्या या लाईव्ह दर्शनामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.परिणामी वन विभागाच्या वतीने प्रभावी उपाययोजना राबवून या दोन्ही बिबट्यांना तात्काळ जेरबंद करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत लाईव्ह वृत्त असे की,तालुक्यातील डोंगर कठोरा येथील मोहाळी शिवारातील शेतकरी मनोहर बळीराम पाटील यांच्या शेतात सदर शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या केळीच्या बागेला पाणी भरत असतांना त्यांना कोणत्यातरी प्राण्याने एका बोकडाला लागलीच खाल्ले असल्याचे लक्षात आले.परिणामी ते घाबरलेल्या अवस्थेमध्ये हळूहळू मागे सरकत असतांना लागलीच त्यांच्या पुढ्यात एक बिबट्याचे लहान पिल्लू त्यांच्या पायावर पडले तसेच त्यांच्या पायावर बिबट्याचा पाय पडल्यामुळे ते खाली पडले व मोठमोठ्याने आरडाओरड करू लागले.त्याचवेळी त्यांच्यापुढे आणखी दुसरा बिबट्या (म्हणजेच त्या लहान बिबट्याची आई) मादी बिबट्या येऊन उभा राहिला.अशावेळी आता आपला जीव हे बिबटे नक्की घेणार या धारणेतून गर्भगळीत झालेले मनोहर पाटील यांनी मोठमोठ्याने आरडाओरड करीत पडलेल्या अवस्थेत त्या बिबट्यांच्या दिशेने केवळ माती फेकत बसले मात्र यात त्यांचे दैव बलत्तर म्हणून त्यांच्या ओरडण्याने त्यांची पत्नी व परिसरातील शेतकरी वेळीच धावून आल्याने सदरील दोन्ही लहान-मोठे बिबटे हे जंगलात पळून गेले व मनोहर पाटील यांचा जीव वाचण्यास मदत झाली आहे.परिणामी मनोहर पाटील यांचा बालंबाल जीव वाचल्याच्या घटनेमुळे परिसरात या दोघांच्या गळाभेटीची चर्चा चर्चिली जात आहे तर २ बिबट्यांच्या लाईव्ह दर्शनामुळे परिसरात कमालीचे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान सदर घटनेबाबत वन विभागाला कळविण्यात आले असून वन विभागाच्या वतीने पिंजरा ठेऊन तसेच कॅमेरे लावून संबंधित बिबट्यांवर निगराणी ठेवली जात आहे अशी माहिती पूर्व विभाग वनक्षेत्रपाल स्वनिल फटांगरे यांनी दिली आहे.सदरहू सदर घटना ही दि.२४ एप्रिल गुरुवार रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमाराला घडली असून बिबट्यांनी फडशा पडलेला बोकड हा डोंगरदा येथील मेंढपाळ ठाकूर पावरा यांचा असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून सांगण्यात आली आहे.तरी वन विभागाने या दोन्ही बिबट्यांना पकडून शेतकऱ्यांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली आहे.