सनी पटेल, पोलीस नायक
दि.२६ मार्च २६ गुरुवार
बारामती तालुक्यातील सुपे येथील श्री शहाजी हायस्कूलचा विद्यार्थी चि. अनुराग संतोष जुन्नरकर याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे. “साकोरा हायस्कूल प्रोग्राम ऑफ जपान अँड इंडिया” अंतर्गत महाराष्ट्रातील अवघ्या चार निवडक बालवैज्ञानिकांमध्ये त्याची निवड झाली असून, ही सुपे गावासह संपूर्ण बारामतीसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
अनुरागने सादर केलेला “Portable Urine Kit in Buses for Male Passengers” हा अत्यंत उपयुक्त व समाजाभिमुख प्रकल्प सर्वांच्या लक्षात राहणारा ठरला. लांब पल्ल्याच्या बस प्रवासात प्रवाशांना भेडसावणारी लघवीची समस्या लक्षात घेऊन तयार केलेल्या या अभिनव संकल्पनेमुळे प्रवास अधिक सुलभ व आरामदायी होऊ शकतो. त्याच्या या कल्पकतेची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आणि त्यातूनच त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मार्ग खुला झाला.
महाराष्ट्र राज्य विज्ञान परिषद, नागपूर यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या INSPIRE Award उपक्रमात त्याची कामगिरी विशेष ठरली. त्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने जुलै महिन्यात जपानमधील टोकियो येथे होणाऱ्या दहा दिवसांच्या शैक्षणिक सहलीसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.
या यशामागे विद्यालयातील विज्ञान शिक्षक श्रीम. जगताप एस. बी. व श्री. चव्हाण एस. व्ही. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री. बनसोडे आर. बी., श्री. झगडे, बारामती तालुका विज्ञान अध्यापक संघ आणि पुणे जिल्हा विज्ञान संघ यांचेही सहकार्य मिळाले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, उपसचिव एल. एम. पवार, परीक्षा विभाग प्रमुख किरण देशपांडे व आजीव सदस्य आर. बी. खैरे यांनी अनुरागचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. लोणकर एस. ए., उपमुख्याध्यापक श्री. यादव डी. बी., पर्यवेक्षक श्री. करे एस. तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे सहकार्य या यशात महत्त्वाचे ठरले. सुपे ग्रामस्थांनीही या यशाबद्दल आनंद व्यक्त करत विद्यार्थ्याचे कौतुक केले.
छोट्या गावातून मोठी झेप घेत अनुरागने जपान गाठत महाराष्ट्राचा मान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावला आहे.