“ज्याचे अन्न खाता त्याच्याशी तरी खोटे बोलू नका” … !! पीक विमा,कृषी समृद्धी योजनेचा निधी व शेतकऱ्यांच्या तुटपुंजे अनुदानावरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ जून २६ सोमवार
राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू आहे व या अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होत असून वेगवेगळ्या मुद्यांवरून अनेकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.या पार्श्वभूमीवर आज दि.२९ जून सोमवार रोजी विधानसभेत पुरवणी मागण्यांच्या संदर्भातील विषयांबाबत बोलतांना भारतीय जनता पक्षाचे नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.यात शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न, कृषी समृद्धी योजनेला मिळणारा तुटपुंजा निधी आणि शेतकऱ्यांना मिळणारे तुटपुंजे अनुदान अशा विविध मुद्यांवरून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला घराचा आहेर देत अनेक सवाल विचारले आहेत.मागच्या वर्षी कृषी समृद्धी योजनेला एक फुटकी कवडी दिली नाही व या वर्षी फक्त २ हजार कोटी दिले.तसेच ज्याचे अन्न
खाता त्याच्याशी तरी किमान खोटे बोलू नका असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
दरम्यान पुरवणी मागण्यांच्या विषयावर बोलतांना सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की,“आपल्याकडे राजव्यवस्थेचे पाच प्रकार असून लोकशाही,राजेशाही,हुकूमशाही, साम्यवाद आणि समाजवाद अशा पाच अवस्थेतून राज्य चालवण्याच्या पद्धती विकसित होतात.यामध्ये मला एक पद्धत जोडण्याची आवश्यकता असल्याचे जाणवते. लोकशाही ही नावापुरती आहे आणि लोकशाही ही आता हेवी झाल्याचे जाणवते कारण पुरवणी मागण्यातील कृषी विभागाच्या विषयात अपेक्षा अशी होती की आमचे कृषीमंत्री अतिशय पोटतिडकीने त्यांच्या भाषणात शेतकऱ्यांच्या समस्या आणि वेदना मांडत होते त्याबाबत मी त्यांचे मनापासून कौतुक करतो पण जेव्हा पुरवणी मागण्या समोर आल्या तेव्हा माझ्या लक्षात आले की,मंत्र्यांच्या मनात काम करण्याची इच्छा आहे म्हणजे कसे की गाडी नवीन घ्यायची आणि त्या गाडीत पेट्रोल टाकायचे नाही फक्त चांगला चालक द्यायचा मग ती गाडी त्या चालकाच्या फक्त आश्वासनावर,भाषणावर आणि भाषणातील शब्दांवर चालणार आहे का ?” असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
“आपण शेतकऱ्यांना पीक विम्याच्या संदर्भात काय शब्द दिला होता ? आपण एक रुपयांमध्ये पीक विमा देतो आणि त्यावर मोठमोठे फ्लेक्स लावतो तेव्हा माझ्या लक्षात आले की त्या पीक विम्याच्या फ्लेक्सवर आपण जो खर्च करतो त्यापेक्षा आपण तो खर्च पायाभूत सुविधांवर खर्च केला तर तो जास्त योग्य आहे कारण आरोग्य बिघडल्यानंतर औषधांवर खर्च करण्याऐवजी आरोग्य बिघडू नये म्हणून जीममध्ये जाण्यासाठी खर्च केला तर आरोग्य बिघडत नाही या भावनेने आपण कृषी समृद्धी योजना आणली होती” असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.“जेव्हा कृषी समृद्धी योजना आणली होती तेव्हा मी स्वत: अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.तेव्हा तुम्ही काय सांगितले होते की त्या योजनेसाठी दरवर्षी ५ हजार कोटी दिले जातील.काय सुंदर स्वप्न रंगवले होते ? २५ हजार कोटी पाच वर्षांत देऊ सांगितले होते पण मागच्या वर्षी एक फुटकी कवडी देखील दिली गेली नाही.आता या वर्षांबाबत मंत्र्यांनी उत्तर द्यावे माझे तुमच्याकडे काही व्यक्तिगत काम नाही किंवा मी तुमच्याकडे कोणाच्या बदलीसाठी येणार नाही.कृषी
समृद्धी योजनेचे मागच्या वर्षाचे ५ हजार कोटी दिले नाही यावर्षी कृषी समृद्धी योजनेला ५ हजार कोटींऐवटीं २ हजार कोटी ठेवले आहेत.अरे ज्याचे अन्न खाता त्याच्याशी तरी खोटे बोलू नका”असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हणत सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
“माझा पहिला प्रश्न असा आहे की असे कोण अधिकारी असतात त्यांचे नाव उत्तरात का घेत नाहीत ? मी आता आकडे वाचत नाही पण बाकी गोष्टींसाठी तुमच्याकडे पैसे असतात आणि शेतकऱ्यांच्या कृषी समृद्धी योजनेसाठी नाहीत का ? शेतकऱ्यांसाठी जर योजना राबवायच्या असतील तर कृषी अधिकाऱ्यांना चांगल्या गाड्या दिल्या पाहिजेत. कारण ते कसे फिरणार ? अन्यथा सरकारच्या अनेक योजना आहेत मग त्या कशा पूर्ण होतील ? म्हणजे शेतकऱ्यांच्या योजना राबवण्यासाठी गाड्या नाहीत,कमवणाऱ्यांसाठी गाड्या नाहीत पण रिकामे उद्योग करणाऱ्यांना गाड्या आहेत त्यामुळे यावर कृषीमंत्र्यांनी योग्य ते पावले उचलणे महत्वाचे आहे” असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
“समजा एखाद्या शेतकऱ्यांची खतामध्ये फसवणूक झाली आणि तो शेतकरी एखाद्या अधिकाऱ्याकडे गेला तर त्या शेतकऱ्याला न्याय देण्याची यंत्रणा तुमच्याकडे कुठे आहे ? कृषीमंत्री एवढे चांगले आहेत की कधी-कधी वाटते की तुम्हाला आमच्या पक्षात घ्यावे पण ते वेळ आल्यावर करू” असा मिश्किल टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की,“कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा पगार एक दिवस उशीरा होत नाही मग शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान वेळेवर का जात नाही ? एकतर तुम्ही जे शेतकऱ्यांना अनुदान देता त्याची किंमत कशी ठरवता हे तुम्हालाच माहिती” असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून नाराजी व्यक्त करीत सरकारला घरचा आहेर दिला आहे.