सनी पटेल,पोलिस नायक
पुणे जिल्हा विभागीय प्रमुख
दि.१० जुलै २६ शुक्रवार
माळेगाव पोलीस ठाण्यासमोरील मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.पावसाळ्यात हे खड्डे पूर्णपणे पाण्याने भरून जात असल्याने “रस्ता कुठे आहे आणि खड्डा कुठे” हे ओळखणेही कठीण होते व त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
विशेष म्हणजे,हा रस्ता पोलीस ठाण्यासमोरचा असूनही त्याची दुरवस्था कायम आहे.दररोज शेकडो नागरिक,पोलीस कर्मचारी आणि विविध शासकीय कामांसाठी येणारे लोक याच मार्गाचा वापर करतात तरीही या समस्येकडे माळेगाव नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार,अनेक वेळा तक्रारी करूनही केवळ आश्वासने दिली जातात.प्रत्यक्षात कायमस्वरूपी दुरुस्ती होत नाही.प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
नागरिकांनी माळेगाव नगरपंचायतीने तातडीने या रस्त्याची पाहणी करून दर्जेदार दुरुस्ती करावी.खड्डे त्वरित बुजवावेत आणि भविष्यात अशा समस्या पुन्हा निर्माण होणार नाहीत व यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते अशीही प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे.