यावल पंचायत समितीच्या शेष निधीतील विकास कामे नेमकी झाली कुठे ? तसेच सदरील खर्चाचा हिशोब जाहीर करण्याची नागरिकांची मागणी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ जुलै २६ शुक्रवार
येथील पंचायत समितीच्या माध्यमातुन शेष निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास झालेला खर्च व सदरची ही कामे कुणी केली ? या विषयाला घेवुन तालुक्यातील नागरिकांमध्ये सध्या उलटसुलट चर्चा सुरू झाली असून या निधीतून प्रत्यक्षात कोणती विकास कामे करण्यात आली ? कुणी केली ? किती निधी खर्च झाला ? कोणत्या गावांना किती लाभ मिळाला ? आणि कोणत्या कामांची पूर्तता झाली ? असे विविध गोंधळेले प्रश्न तालुक्यात चर्चेला जात आहे.याबाबत प्रशासनाने सविस्तर माहिती जाहीर करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान तालुक्यात अनेक विकासकामांच्या घोषणा झाल्या व काही कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती देण्यात आली.मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामांचा ठोस मागमूस दिसत नसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे व त्यामुळे शेष निधीचा विनियोग नेमका कशासाठी झाला ? याचा खुलासा होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.नागरिकांच्या मते,पंचायत समितीने शेष निधी अंतर्गत मंजूर झालेल्या सर्व कामांची यादी,संबंधित गावांची नावे,मंजूर रक्कम,प्रत्यक्ष खर्च,काम पूर्ण झाल्याची स्थिती,संबंधित कंत्राटदारांची माहिती तसेच तांत्रिक पूर्णता प्रमाणपत्र सार्वजनिक करावे त्यामुळे विकासकामांबाबत कोणताही संभ्रम राहणार नाही आणि प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल.सामाजिक कार्यकर्त्यांनीही या प्रकरणात पारदर्शकतेची भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.”लोकांच्या पैशातून विकासकामे होत असल्याने प्रत्येक रुपयाचा हिशोब नागरिकांसमोर येणे हा त्यांचा अधिकार आहे,” असे मत अनेकांनी व्यक्त केले.यावल तालुक्यातील नागरिक आता पंचायत समितीकडून अधिकृत माहितीची अपेक्षा व्यक्त करत असून शेष निधीतील सर्व कामांचा तपशील सार्वजनिक करण्याची मागणी नागरीक करीत आहे.प्रशासनाने याबाबत अधिकृत निवेदन देऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.