QR कोड नसलेल्या जुन्या जन्म-मृत्यू दाखल्यांच्या समस्येवर तोडगा काढा !! नगराध्यक्षा छायाताई पाटील यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ जुलै २६ बुधवार
पूर्वीच्या काळात यावल नगरपरिषदेकडून जारी करण्यात आलेल्या जन्म व मृत्यू दाखल्यांवर QR Code उपलब्ध नसल्यामुळे तसेच जुन्या नोंदवह्या जीर्ण झाल्यामुळे नागरिकांना नवीन दाखले मिळवण्यात व विविध कामांमध्ये ऑनलाइन पडताळणी करताना मोठ्या तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.या समस्येवर तातडीने प्रशासकीय व तांत्रिक तोडगा काढून मार्गदर्शन करावे अशी आग्रही मागणी यावल नगर परिषदेच्या नगराध्यक्षा छाया अतुल पाटील यांनी जिल्हा निबंधक तथा जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.नगराध्यक्षा छाया पाटील यांनी दिलेल्या पत्रानुसार,पूर्वीच्या काळात प्रचलित असलेल्या नियमांनुसार जारी करण्यात आलेल्या दाखल्यांवर QR कोड नसे.मात्र सद्यस्थितीत विविध शासकीय व खासगी कार्यालयांकडून ऑनलाइन QR कोडद्वारेच पडताळणीची अट घातली जात आहे.जुने दाखले कायदेशीररीत्या वैध असूनही ऑनलाइन पडताळणी होत नसल्याच्या कारणास्तव नागरिकांचे अर्ज वारंवार नाकारले (Reject) जात आहेत.

नागरिकांना शैक्षणिक,बँकिंग व शासकीय कामांत अडचणी
नगर परिषदेकडे उपलब्ध असलेल्या अनेक जुन्या जन्म-मृत्यूच्या मूळ नोंदवह्या (Registers) काळाच्या ओघात जीर्ण झाल्या आहेत.बऱ्याच प्रकरणांमध्ये नागरिकांकडे मूळ दाखला उपलब्ध नसतो अशावेळी नोंदवहीतील नोंदींच्या आधारे नवीन दाखला देताना QR कोड नसणे,ऑनलाइन पडताळणी न होणे आणि इतर तांत्रिक त्रुटींमुळे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ,शैक्षणिक प्रवेश,न्यायालयीन कामे,बँकिंग व इतर प्रशासकीय कामांसाठी आवश्यक असलेले दाखले मिळण्यात प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.Qसदरहू R कोड नसलेल्या जुन्या दाखल्यांना वैध मान्यता मिळावी व जुन्या दाखल्यांना वैध मानण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात यावेत,जीर्ण नोंदींच्या आधारे नवीन दाखले,जीर्ण नोंदवह्यांमधील नोंदींच्या आधारे नवीन दाखले निर्गमित करण्यासाठी सोपी व स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करावी,ऑनलाइन पडताळणीतील अडचणी दूर करण्यासाठी तातडीने तांत्रिक उपाययोजना व मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून द्याव्यात,नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने या विषयावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी अपेक्षा नगराध्यक्षा छाया अतुल पाटील यांनी व्यक्त केली आहे.