Just another WordPress site

जळगावात ‘एफडीए’ची धाडशी कारवाई… !! ५ हॉटेलचे परवाने निलंबित तर ५०० लिटर दूध नष्ट तसेच ३८ लाखांचा गुटखा जप्त !!

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०३ ऑगस्ट २६ सोमवार

जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यां विरोधात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने गेल्या काही महिन्यांत व्यापक मोहीम राबवत कठोर कारवाईचा धडाका लावला असून अस्वच्छता,निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ,विनापरवाना व्यवसाय आणि प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीवर लक्ष केंद्रित करत विभागाने विविध ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.सदरहू या कारवाईत पाच हॉटेल व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले असून गुटख्याच्या २२ कारवायांमध्ये २८ संशयितांना अटक करण्यात आली आहे तर ५०० लिटर दूषित दूधाचा मोठा साठा नष्ट करण्यात आला आहे.परिणामी भेसळखोर व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.दरम्यान एफडीएच्या या मोहिमेत प्रतिबंधित गुटख्याविरोधात सर्वाधिक कारवाई करण्यात आली असून जिल्ह्यात विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या २२ धाडींमध्ये तब्बल ३८ लाख १३ हजार ४९३ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे तर या प्रकरणांमध्ये २८ संशयितांना अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.सदरहू गुटख्याच्या अवैध साठवणूक आणि विक्रीविरोधात विभागाची मोहीम पुढेही कायम राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान गुटख्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकणाऱ्या विविध अन्नपदार्थांवरही विभागाने कारवाई केली असून प्रिझर्व्ह फूड,तूप,बेकरी उत्पादने, सुटे खाद्यतेल,मिठाई आणि दूध या पदार्थांशी संबंधित १६ प्रकरणांमध्ये १६ लाख ३ हजार ९१६ रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.तसेच या नमुन्यांची तपासणी सुरू असून अहवालानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.त्याचबरोबर दूध विक्रीतील गैरप्रकार रोखण्यासाठीही विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबवली जात असून तपासणी दरम्यान निकृष्ट आणि दूषित आढळलेल्या ५०४ लिटर दुधाचा साठा नष्ट करण्यात आला आहे.सदरहू या दुधाची अंदाजे किंमत २६ हजार ४८७ रुपये इतकी असल्याची माहिती विभागाने दिली आहे.तसेच दूषित दूध बाजारात पोहोचण्यापूर्वीच नष्ट केल्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा संभाव्य धोका टळल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवरही एफडीएने कारवाईचा बडगा उगारला जात असून विनापरवाना अन्न व्यवसाय,उघड्यावर अन्न विक्री तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७७ प्रकरणांमध्ये ५ लाख २४ हजार रुपयांचा तडजोड दंड वसूल करण्यात आला आहे.तर अनेक व्यावसायिकांना अन्न सुरक्षा मानकांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तपासणी दरम्यान अनेक हॉटेल आणि खाद्य व्यावसायिकांकडे स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसविल्याचे आढळून आले असल्याने स्वयंपाक घरातील अस्वच्छता, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक,स्वच्छतेच्या निकषांचे उल्लंघन आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे पाच हॉटेलव्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले.आवश्यक सुधारणा केल्यानंतरच त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.दरम्यान ग्राहकांना सुरक्षित,दर्जेदार आणि स्वच्छ अन्न उपलब्ध करून देणे ही प्रत्येक अन्न व्यावसायिकाची कायदेशीर जबाबदारी असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.तर विभागाकडून पुढील काळातही नियमित तपासण्या सुरू राहणार असून तपासणी दरम्यान त्रुटी आढळल्यास संबंधितांना नोटीस देण्यात येईल व नोटिशीत नमूद केलेल्या मुदतीत सुधारणा न केल्यास परवाना निलंबन,रद्द करणे तसेच फौजदारी कारवाईसह कठोर उपाययोजना करण्यात येतील असा इशाराही विभागाने दिला आहे.नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात सुरू असलेली ही मोहीम पुढील काळात आणखी तीव्र केली जाणार असून अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.