अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ३१.७४ टक्के मतदान
दि.६ नोव्हेंबर रोजी रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी
अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपच्या मुरजी पटेल यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली होती त्यामुळे ही पोटनिवडणूक एकतर्फी झाली होती. यामध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात आहे.परंतु मतदानाच्या काही दिवस आधी भाजपकडून पडद्यामागून ‘नोटा’चा प्रचार केला जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून (ठाकरे गट) करण्यात आला होता.ऋतुजा लटके यांच्यापेक्षा नोटा या पर्यायाला जास्त मते पडावीत यासाठी पद्धतशीर आखणी केली जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे होते आता या पोटनिवडणुकीत अगोदरच अवघे ३१ टक्के मतदान झाले आहे यामध्ये आता नोटाला किती मते पडणार हे पाहणे औत्स्युकाचे असेल.मुरजी पटेल यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेऊनही मतदान केले होते त्यामुळे त्यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी नोटा की अपक्ष यापैकी नक्की कोणाची निवड केली असावी? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या पोटनिवडणुकीत अवघ्या ८५,६९८ नागरिकांनी मतदान केल्याने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना निर्भेळ विजय मिळाल्याचे दाखवायचे असल्यास मोठ्या मताधिक्याने निवडून यावे लागेल ही पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र लढवली होती.अंधेरी पूर्व भागातील शिवसेनेची पारंपरिक व्होटबँक आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतदारांचा टक्का लक्षात घेता ऋतुजा लटके यांना ४५ ते ५० हजार इतकी मते पडतील अशी अपेक्षा आहे.आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते ऋतुजा लटके यांच्याकडे ट्रान्सफर होणार का?हे पाहावे लागले. तसे घडले तरच ऋतुजा लटके यांना निर्भेळ यश आणि दणदणीत विजय मिळवता येणे शक्य आहे.या सगळ्यात ठाकरे गटाने दावा केलेला नोटा फॅक्टरही निर्णायक ठरू शकतो तसेच मतदारसंघातील कोणत्या प्रभागांमधून ऋतुजा लटके यांना आघाडी मिळणार हा फॅक्टरही आगामी महानगरपालिका निवडणुकीच्यादृष्टीने निर्णायक ठरेल त्यामुळे आता प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी काय होणार?याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.