राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांना २०१६ च्या कथित भोसरी पुणे जमीन व्यवहार प्रकरणात १ लाख रुपयांच्या जामिनावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे.मंदाकिनी खडसे यांचे वकील मोहन टेकवडे यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली आहे.परंतु न्यायालायने मंदाकिनी खडसे यांना विनापरवानगी देश सोडून जाऊ नये तसेच न्यायालयाकडून त्यांना जेव्हाही बोलावले जाईल तेव्हा त्यांना तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहावे लागणार आहे त्याचबरोबर पुराव्यांशी छेडछाड करू नये असेही न्यायालयाने त्यांना बजावले आहे.
देवेंद्र फडणवीस सरकार यांच्या कालावधीत महसूल मंत्रीपदी असतांना एकनाथ खडसे यांनी पुण्यातील भोसरीमधील ३.१ एकर जमिनीचा एमआयडीसी मधील प्लॉट खरेदी करण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ साली करण्यात आला होता.सदरील जमीनीची किंमत ३१ कोटी रुपये इतकी असून ती केवळ ३ कोटी ७० लाख रुपयांना विकण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे.हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता परंतु त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ साली तो अधिग्रहण केला होता.अब्बास उकानी यांना नुकसान भरपाई देण्याबाबतचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे.एकनाथ खडसे यांनी १२ एप्रिल २०१६ रोजी या प्रकरणासंदर्भात बैठक बोलावली व अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याबाबत त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा या प्रकरणात करण्यात आला आहे.सदरील बैठकीनंतर अवघ्या पंधरवड्यात अब्बास उकानी यांनी एकनाथ खडसे यांच्या नातेवाईकांना म्हणजेच त्यांची पत्नी व जावयाला हा भूखंड विकला होता.