यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील सांगवी खुर्द येथील राजरोसपणे विक्री होणाऱ्या गावठी दारूची विक्री कायमस्वरूपी बंद करावी असा ठराव ग्राम पंचायतीच्या वतीने नुकताच करण्यात आला आहे.याबाबतची माहिती यावल पोलीसांना येथील सरपंच ज्योती डिगंबर कोळी यांनी तक्रार निवेदनाद्वारे नुकतीच दिली आहे.
याबाबत पोलीस निरिक्षक यांना दिलेल्या तक्रार निवेदनात सांगवी खुर्द सरपंच ज्योती डिगंबर कोळी यांनी म्हटले आहे की,आमच्या सांगवी खुर्द ग्रामपंचायत हद्दीत रविन्द्र पोपट कोळी व प्रदीप पोपट कोळी हे अवैद्यरित्या रसायन युक्त गावठी हातभट्टीची दारू तयार करून गावात राजरोसपणे विक्री करीत आहेत.या खुलेआम मिळणाऱ्या दारूमुळे व्यसनाच्या आहारी गेलेल्या दारूड्यांमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे.तरी सदरची दारू विक्री कायमची बंद व्हावी यासाठी परिसरातील नागरीकांच्या तक्रारी ग्रामपंचायतकडे आल्याने येथील महिला सरपंच ज्योती डिगंबर कोळी यांनी ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण सभेत गावात विक्री होणाऱ्या गावठी दारूची विक्री कायमची बंद करण्यात यावी असा ठराव संमत करून घेतला आहे.याबाबत पोलीस प्रशासनाने तात्काळ योग्य कारवाई करून दारू विक्रीचा धंदा कायमचा बंद करावा अशी तक्रार निवेदनाव्दारे सरपंच ज्योती डिगंबर कोळी यांनी पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्याकडे केली आहे.गावठी दारूच्या आहारी जावुन मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या वाढली असुन अशावेळी त्यांच्या व्यसनापायी कुटुंबावर उपासमारीचा प्रसंग ओढवला जात आहे.याबाबत गावातील अनेक महीला भगिनी हे आपल्याकडे कुटुंबाची व्यथा मांडतात त्यामुळे एक महिला सरपंच असल्यामुळे माझे याविषयी काळजी घेणे कर्तव्य आहे असे सरपंच ज्योती कोळी यांनी म्हटले आहे.त्यांच्या या जागरूकतेचे परिसरात कौतुक केले जात आहे.