Just another WordPress site

“संस्कृतीच्या बाबतीत नेहमीच फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचण्याची वेळ महाराष्ट्रावर”ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
१२ जुलै २३ बुधवार

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करत राज्यात एका नव्या वादाला तोंड फोडले असून देवेंद्र फडणवीस हे नागपुरला लागलेले कलंक आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद काल ११ जुलै मंगळवार रोजी दिवसभर राजकीय वर्तुळातून उमटत होते यादरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.यावरून ठाकरे गटाने आज दि.१२ जुलै बुधवार रोजी पुन्हा हल्लाबोल केला आहे असून आता अजित पवारांचे चक्की पिसिंग,हसन मुश्रीफांचा घोटाळा,भुजबळ-हर्षवर्धन पाटलांपासून ते राहुल कुलपर्यंत हजारो कोटींच्या घोटाळ्यांचे शेण सरकारच्या तोंडात गेले आहे.महाराष्ट्राने संस्कृतीच्या बाबतीत नेहमीच फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचण्याची वेळ महाराष्ट्रावर ज्यांनी आणली त्यांची घाणेरडी वकिली फडणवीस करीत आहेत म्हणूनच तुम्ही कलंकित आहात! ईश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो.‘कलंक’ मतीचा झडो इतकीच प्रार्थना! असे ठाकरे गटाने त्यांचे मुखपत्र असलेल्या सामनातील अग्रलेखात म्हटले आहे.काही लोकांची मती कलंकित झाली आहे आणि त्यांची कलंकित मती हेच महाराष्ट्राचे ज्ञान,शहाणपण व मास्टर स्ट्रोक असा काही जणांनी समज करून घेतला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘मास्टर स्ट्रोक’ मारतात असे त्यांचे पगारी भगतगण नेहमी सांगतात. लोकमान्य टिळक सांगायचे एक आण्याचा गांजा,चिलीम मारली की भरपूर कल्पना काही लोकांना सुचतात भाजपच्या पगारी भजनी मंडळाचे तसेच आहे.फडणवीस यांनी आता असा ‘स्ट्रोक’ मारला आहे की त्यावर भाजपचेच लोक अचंबित झाले आहेत अशी टीका ठाकर गटाने केली आहे.

फडणवीस यांनी म्हटले आहे,ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला त्यांच्यासोबत पंक्तीला बसून खाणे हा कलंक आहे.फडणवीस यांनी स्वतःच्या मनाची व्यथा अशा प्रकारे व्यक्त केलेली दिसते.आता कोण कोणाच्या पंक्तीला बसून काय खात आहे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. हा शेण खाण्याचा कलंकित प्रकार फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभर सुरू आहे व त्यात महाराष्ट्र सर्वाधिक कलंकित होत आहे.आम्ही विदर्भाच्या दौऱ्यात सांगितले की,देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला कलंकित केले हा कलंक-बाण त्यांच्या भक्तमंडळाच्या काळजात घुसला व त्यांनी त्यावर थयथयाट सुरू केला व ही कलंकित नाचेगिरी गेल्या काही काळापासून महाराष्ट्र सहन करत आहे असा घणाघातही ठाकरे गटाने केला आहे.महाराष्ट्रात पूर्वी एकच लखोबा लोखंडे होता.आज अनेक नामचीन लखोबा लोखंड्यांना घेऊन भाजपने सरकार स्थापन केले आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेस शेण फासण्याचाच हा प्रकार असून राज्यातील राजकारणात नीतीतत्त्वाचे महत्त्व संपले आहे.भाजपच्या जुन्याजाणत्या नेत्यांच्या नशिबी भ्रष्ट लखोबांच्या सतरंज्या उचलणे एवढेच आले हा प्रकार म्हणजे सहन होत नाही व सांगताही येत नाही असाच आहे.देवेंद्र फडणवीस हे कलंकित नाहीत ते एक थोर महात्मा किंवा गौरवपुरुष आहेत असे एकवेळ मान्य करू मग दोन्ही मांड्यांवर कलंकित दुर्योधन, कंसमामा,रावणास बसवून ते कोणते नीतीचे राज्य चालवीत आहेत? असा सवालही यावेळी करण्यात आला.

सत्य असे आहे की,महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता आणायचे काम फडणवीसांनी केले त्यांचे मास्टर स्ट्रोक म्हणजे काय? हाताशी केंद्रीय तपास यंत्रणा आहेत म्हणून हे मास्टर स्ट्रोक आहेत.ज्या दिवशी दिल्लीची सत्ता जाईल त्याक्षणी या मास्टर स्ट्रोकचे काय होईल? यंत्रणांची दहशत माजवून चाणक्यगिरी चालली आहे याला मर्दानगी म्हणता येत नाही हा कलंकच आहे.फडणवीस म्हणतात ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचे आरोप केले त्यांच्या पंक्तीला बसणे हे बरे आहे काय?’ देवेंद्रजी हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला तर बरे होईल.शिंदे-मिंधे गटातील आमदार,खासदारांचे हात व तोंड शेणाने बरबटले आहेच.कुणाकुणाची नावे घ्यायची? आता अजित पवारांचे चक्की पिसिंग,हसन मुश्रीफांचा घोटाळा,भुजबळ-हर्षवर्धन पाटलांपासून ते राहुल कुलपर्यंत हजारो कोटींच्या घोटाळ्यांचे शेण सरकारच्या तोंडात गेले आहे या शेणास तुम्ही नागपूरची बासुंदी म्हणत असाल तर या आजारावर एखादा उपचार करूनच घ्या.स्वतः शेण खायचे व दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घ्यायचा असे एकंदरीत तुमचे धोरण दिसते आहे असा हल्लाबोलही करण्यात आला.महाराष्ट्राच्या परंपरा व संस्कृतीवर शेणफेक करण्यात तुम्ही धन्यता मानत आहात. भ्रष्टाचारी,गुन्हेगार,व्यभिचारी अशा लोकांना भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये घालून त्यावर चांदीचा वर्ख चढवायचा व बाजारात उभे करायचे या घाणेरड्या राजकारणास ‘कलंक’ नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? भारतीय जनता पक्ष हा अटल बिहारी वाजपेयींच्या काळातला राहिलेला नाही व नागपूरही आता खऱ्या संघ विचारांचे उरलेले नाही तेथेही भेसळच फार झाली आहे.क्षणभंगूर सत्ता संपादनासाठी भ्रष्टाचारी लोकांशी शय्यासोबत करण्यास नैतिकतेचे बिरुद मिरवणाऱ्यांनाही लाज वाटत नाही.अजित पवार,मुश्रीफ,गोंदियाचे पटेल,भुजबळ हे कलंकित की स्वच्छ राजकीय चारित्र्याचे हे फडणवीसांनी जाहीर करावे.फुटलेल्या शिवसेना आमदारांवरील ‘ईडी’ कारवाईच्या फायली कोणत्या बैलांच्या गोठ्यात दडपून त्यावर शेणसड्यांनी सारवण केले तेसुद्धा सांगा असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.