Just another WordPress site

इर्शाळवाडीत दरड कोसळून चार जणांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता,NDRF ची बचाव पथक घटनास्थळी दाखल

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० जुलै २३ गुरुवार

रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना समोर आली असून परिसरात अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.या दुर्घटनेनंतर एनडीआरएफची दोन पथक बचावकार्यासाठी इर्शाळवाडीत दाखल झाली आहेत.या बचाव पथकांचे  शोधकार्य सुरू आहे तसेच मुंबईहून आणि पनवेलहूनही तीन बचाव पथक इर्शाळवाडीत दाखल झाली आहेत.लोकांच्या मदतीसाठी पोलिसांनी नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.उद्योगमंत्री उदय सामंत आणि बंदरविकास मंत्री दादा भुसे घटनेची पाहणी करण्यासाठी इर्शाळवाडीत दाखल झाले आहेत.दरम्यान बचाव पथकांनी आतापर्यंत २२ जणांची सुखरूप सुटका केली आहे अजूनही अनेक लोक अडकल्याची भीती आहे.सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे १०० हून अधिक अधिकारी-कर्मचारी बचाव कार्यात गुंतले असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.यासह बचावकार्यात एनडीआरएफ,स्थानिक आणि काही स्वयंसेवी संस्थांकडून मदत मिळत असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

इर्शाळवाडी हे एक छोटेसे गाव असून या गावात ५० ते ६० घरांची वस्ती असून पावसामुळे इर्शाळगड खडकाचा काही भाग कोसळला असून त्यात अनेक गावकरी माती-खडकांच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे.ही घटना काल दि.१९ जुलै बुधवार रोजी रात्री ११.३० ते १२ च्या दरम्यान घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.या घटनेची माहिती देताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की,रात्री ११ च्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली आहे.डोंगराळ भागात अजूनही भूस्खलन होत असून त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचण निर्माण होत आहे.एनडीआरएफची बचाव पथक दाखल झाली आहेत व आतापर्यंत या बचाव पथकांनी २५ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.जखमींना नवी मुंबईतील रुग्णालयात नेण्यात येत आहे असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.