यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० फेब्रुवारी २४ शनिवार
राज्यातील लाखो भक्त भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तालुक्यातील अट्रावल येथील श्री मुंजोबा यांच्या पारंपारिक यात्रेस आज शनिवार दि.१० फेब्रुवारी पासून प्रारंभ होत आहे.या देवस्थानच्या विश्वस्तांच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी यात्रेची परिपूर्ण तयारी झाली असून यात्रा स्थळी व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत.पोलीस उपाधीक्षक अन्नपूर्णा सिंह व यावलचे सहाय्यक पोलीस निरिक्षक हरिष भोये यांनी यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला असून यात्रोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही तसेच भाविकांच्या दर्शनासाठी विश्ववस्तांच्या माध्यमातुन काय सोयी सुविधा करण्यात येणार आहे याबाबतचा आढावा त्यांनी घेतला आहे.या यात्रा उत्सव वाराच्या काळासाठी यात्रेच्या दिवशी येथील यावल एसटी आगारासह भुसावळ,फैजपूर,चोपडा व जळगाव येथून ही बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत.या यात्रेसाठी दरवर्षी भक्तांची वाढती गर्दी पाहता यावर्षी देवस्थान समितीने चोख व्यवस्था केली आहे.
सदरहू तालुक्यातील अट्रावल येथील प्रसिद्ध मुंजोबा मंदिर म्हणजे नवसाला पावणारा अशी भाविकांची श्रद्धा आहे.महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगत असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील बऱ्हाणपूर या जिल्ह्यासह जिल्ह्यातील भाविक यात्रेत हजेरी लावतात.माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील शनिवार व सोमवारसह पोर्णिमेला ही यात्रा भरते.माघ शुक्ल पक्षातील पहील्या तीथीलाच शनिवार आल्याने आजपासून यात्रा प्रारंभ होत आहे.यावर्षी यात्रेचे पौर्णिमेसह पाच वार पडत आहेत.यात १० फेब्रुवारी (शनिवार),१२ फेब्रुवारी (सोमवार),१७फेब्रुवारी (शनिवार),१९ फेब्रुवारी (सोमवार), २३ व २४ फेब्रुवारी (पोर्णिमा) असे यात्रेचे वार आहेत.यासह यात्रोत्सव काळात गर्दी टाळण्यासाठी तसेच सुटीचे व सोईनुसार मधल्या दिवसात ही येथे भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते.दरम्यान राज्य परिवहन महामंडळाकडून यावल,भुसावळ,फैजपूर,रावेर तसेच इतर स्थानकांमधून ही यात्रेच्या दिवशी एसटी बसेस सोडल्या जाणार असून येथील पोलीस ठाण्याकडून यात्रास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्तासह देवस्थानचे स्वयंसेवक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत.