Just another WordPress site

“मला कुठे जायला आवडेल ही निवड मी द्यायला आता उशीर झालेला आहे”-पंकजा मुंडेंचे मोठे विधान;तर्क-वितर्कांना उधाण !

बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१२ फेब्रुवारी २४ सोमवार

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीवरून गेल्या काही वर्षांत मोठी चर्चा पाहायला मिळाली.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना न देण्यात आलेल्या उमेदवारीवरून तेव्हा चर्चा झाली त्यावेळी भाजपात असणारे एकनाथ खडसे,पंकजा मुंडे व विनोद तावडे त्यावरून नाराज असल्याच्याही बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या तेव्हापासून पंकजा मुंडेंना भाजपाने बाजूला सारले असून त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याचे दावे केले जात होते.आता पुन्हा एकदा त्यांच्या राज्यसभा उमेदवारीची चर्चा सुरू झाली असून त्यावर पंकजा मुंडे यांनी स्वत: मोठे विधान केले आहे. त्या बीडमध्ये एका जाहीर कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होत्या.पंकजा मुंडे सध्या भाजपाच्या राष्ट्रीय मंत्री असून त्यांना फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यासंदर्भात जेव्हा माध्यम प्रतिनिधींनी देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली तेव्हा त्यांनी यासंदर्भात चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.पंकजा मुंडे आणि माझी संघटनेच्या विषयानिमित्त नेहमीच भेट होत असते पण आमच्या भेटीत राज्यसभेच्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.राज्यसभेत कोण जाणार? याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेत असतात.पंकजा मुंडे या राष्ट्रीय मंत्री आहेत त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचे की आणखी कोणते पद द्यायचे हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल असे ते म्हणाले.

दरम्यान आपल्या उमेदवारीच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.गेल्या ५ वर्षांत अशी कोणती निवडणूक आली ज्यात माझे नाव नव्हते ? विधानसभा,राज्यसभा या कोणत्याही निवडणुकीत माझे नाव चर्चेत येते.गेल्या अनेक वर्षांपासून मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे असे लोकांना वाटते त्या हिशेबाने लोक माझे नाव घेतात.आता या तीन पक्षांच्या सरकारमुळे अशी चर्चा आहे की मला मतदारसंघच राहिलेला नाही त्यामुळे साहजिकच या चर्चा येतात त्यावर मी काहीही करू शकत नाही असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. दरम्यान सध्याच्या उमेदवारीच्या चर्चेबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता पंकजा मुंडेंनी त्यावर सूचक विधान केले आहे.मला कुठे जायला आवडेल ही निवड मी द्यायला आता उशीर झालेला आहे.आता माझ्याकडे मोठ्या उमेदीने पाहणाऱ्या लोकांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्त्वाचा विषय आहे.त्यांना मला जिथे पाहायला आवडेल तिथे मी दिसले तर फार मोठी गोष्ट आहे असे त्या म्हणाल्या.दरम्यान आपण कधीच चेहऱ्यावर दु:ख दाखवत नाही असेही विधान पंकजा मुंडेंनी यावेळी केले आहे.त्यांच्या खांद्याच्या दुखापतीविषयी विचारणा केली असता त्या म्हणाल्या,मला डाव्या खांद्याला कॅप्सुलायटस झाले आहे त्यामुळे मला हात उचलता येत नाही पण माझा स्वभाव आहे की जनतेत आल्यानंतर मी कधीच दु:ख चेहऱ्यावर दिसू देत नाही मग ते मनाला झालेले दु:ख असेल किंवा शरीराला झालेले असेल असे त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.