Just another WordPress site

महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण ; ४८ मतदारसंघांची पूर्ण यादी एकत्र जाहीर केली जाईल ; संजय राऊतांचे मोठे विधान

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१४ मार्च २४ गुरुवार

राज्यात महायुतीमधील भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर झाली असून त्यातील उमेदवारांची चर्चा पाहायला मिळत आहे.राज्यातील २० लोकसभा मतदारसंघांवर भाजपाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत त्यामुळे महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार किमान २० जागा भाजपाच्या पारड्यात पडल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान राहिलेल्या २८ जागांमध्ये कुणाला किती आणि कुठे जागा मिळतात याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीचेही जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे.महायुतीमध्ये भाजपासोबत एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोन गट सहभागी झाल्यामुळे तिन्ही पक्षांमधील विद्यमान खासदार व इच्छुक उमेदवारांमध्ये चढाओढ सुरू झाल्याचे सांगितले जात आहे तर काही इच्छुकांची नाराजी झाल्याचही बोलले जात आहे.त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्येही उद्धव ठाकरे व शरद पवार हे दोन गट विद्यमान खासदार फुटल्यामुळे अल्पमतात आले असले तरी त्या त्या मतदारसंघात प्रभाव असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे जागावाटप कसे असेल ? याचीही उत्सुकता कमालीची ताणली गेली असतांना हे जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान यावेळी राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची यादी तयार असल्याचे संजय राऊत म्हणाले. “महायुतीमध्ये जागावाटपाबाबत अजिबात संभ्रम नाही.४८ मतदारसंघांची पूर्ण यादी एकत्र जाहीर केली जाईल.जागावाटप पूर्ण झाले आहे” असे ते म्हणाले.कलाबेन डेलकर यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता त्यावरून संजय राऊतांनी डेलकर कुटुंबाला लक्ष्य केले.कलाबेन डेलकर यांचे नाव भाजपाच्या यादीत आहे तरी ती जागा शिवसेना लढणार आहे.त्या संकटात असतांना त्या कुटुंबाला शिवसेनेनेच साथ दिली अशा स्थितीत त्या कुटुंबाला इमान नसेल,निष्ठा नसेल तर बघू असे ते म्हणाले.संजय राऊत यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलतांना राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेसंदर्भात भूमिका मांडली.“महाविकास आघाडी,इंडिया आघाडी आम्ही सगळे एक आहोत. राहुल गांधी महाराष्ट्रात आले आहेत.आज ते चांदवडमध्ये शेतकरी मेळावा घेत आहेत.शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,इतर सर्व घटक पक्षांनी त्या मेळाव्यात उपस्थित राहण्याचे ठरले आहे.१७ तारखेला मुंबईत समारोप आहे.शिवाजी पार्कवर स्वत: उद्धव ठाकरे उपस्थित राहतील.काल राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली.शिवाजी पार्कच्या मेळाव्याबाबत ते बोलले.राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना खास निमंत्रण दिले आहे.आज नाशिकमध्ये शिवसेना मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करणार आहे असे संजय राऊत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.