नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ ऑक्टोबर २४ मंगळवार
महाराष्ट्रात अखेर विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक आयोगाने जाहीर केले असून त्यानुसार राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.महाराष्ट्रासोबतच केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी झारखंड राज्याचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून झारखंडमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.पण झारखंडची मतमोजणी मात्र महाराष्ट्रासोबतच म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.पण या सर्व पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप चर्चेत असून त्यावरही राजीव कुमार यांनी उत्तर दिले आहे.लोकसभा निवडणूक निकालांनतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे वेध राजकीय पक्षांबरोबरच तमाम जनतेलाही लागले होते त्यानुसार आज केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही राज्यांमधील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.मात्र नुकत्याच झालेल्या हरियाणा व जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांनंतर काही पक्षांकडून ईव्हीएमबाबत आक्षेप नोंदवण्यात आले होते. ईव्हीएम मशीनमधील बॅटरीबाबतही संशय व्यक्त करण्यात आला होता.आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांबाबत घोषणा करतांना निवडणूक आयुक्तांनी ईव्हीएमबाबतच्या आक्षेपांनाही उत्तर दिले आहे.
पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना ईव्हीएममधील घोटाळ्याबाबतच्या आरोपांबाबत विचारणा केली असता त्यावर त्यांनी या तक्रारी निरर्थक असल्याचे नमूद केले असून “अजून किती वेळा आम्ही या सगळ्या गोष्टी सांगायच्या ?” असा उद्विग्न सवालही त्यांनी उपस्थितांना केला.“मी अनेकदा सांगून झालंय.आज पुन्हा सांगतो.मी दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगेन.लोक मला विचारतात की पेजरनेही स्फोट घडवून आणला जाऊ शकतो तर मग ईव्हीएम हॅक का करू शकत नाही ? अरे बाबा पेजर कनेक्टेड असतात,ईव्हीएम कनेक्टेड नसतात” असे ते म्हणाले.ईव्हीएमची पहिल्या पातळीवरची तपासणी म्हणजेच FLC (First Level Checking) मतदानाच्या ५ ते ६ महिन्यांपूर्वी होते.आमच्याकडे ईव्हीएमबाबत २० तक्रारी आल्या आहेत.प्रत्येक तक्रारीचे आम्ही तथ्यांच्या आधारे स्वतंत्र उत्तर देऊ.यात कोणतीही शंका नाही.आम्ही प्रत्येक उमेदवाराला माहिती देऊ.जर उमेदवार आमच्याकडे माहिती मागत आहे तर ती देणे हे आमचे काम आहे.प्रत्येक उमेदवाराला आम्ही लेखी उत्तर देऊ असे ते म्हणाले.“फर्स्ट लेव्हल चेकिंग,रँडमायझेशन,सेकंड रँडमायझेशन,स्टोरेजमध्ये ठेवणे,स्टोरेजमधून बाहेर काढणे,कमिशनिंग करणे,त्यानंतर पुन्हा स्टोरेजमध्ये ठेवणे,त्यानंतर मतदानाच्या प्रक्रियेसाठी नेणे,मतदान केंद्रावर पोहोचवणे,तिथे दिवसभर मतदान करून घेणे,त्यानंतर सील करणे,पुन्हा स्टोरेजमध्ये ठेवणे,पुन्हा मोजणीच्या वेळी बाहेर काढणे,पुन्हा दिवसभर दाखवणे या प्रत्येक वेळी राजकीय पक्ष वा उमेदवाराचे प्रतिनिधी उपस्थित असतात असे ते म्हणाले.
दरम्यान यावेळी निवडणूक आयुक्तांनी मतदान यंत्रामध्ये टाकण्यात येणाऱ्या बॅटरीबाबतही स्पष्टीकरण दिले असून मशीनमध्ये कमिशनिंग होते तेव्हा त्यात बॅटरी टाकली जाते.मतदानाच्या ५ ते ६ दिवस आधी कमिशनिंग होते त्या दिवशी मशीनमध्ये निवडणूक चिन्ह टाकली जातात व त्याच दिवशी मशीनमध्ये नवीन बॅटरी टाकली जाते.सील केल्यानंतर त्या बॅटरीवरही उमेदवारांच्या सह्या होतात.कमिशनिंगनंतर उमेदवारांच्या समोर स्ट्राँगरूममध्ये त्या मशीन जातात.डबल लॉक लागते.तीन स्तरांची सुरक्षा असते.निरीक्षक असतात.मोजणीच्या दिवशी मशीन बाहेर काढल्या जातात तिथेही ही प्रक्रिया पुन्हा होते.त्या सगळ्या प्रक्रियेचे चित्रीकरण होते त्यानंतर स्थानिक निवडणूक अधिकारी सोबत असतात तिथेही उमेदवारांचे प्रतिनिधी सोबत असतात.त्या मशीनचे क्रमांकही सगळ्यांना दिले जातात अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.मतदान झाल्यानंतर पुन्हा उमेदवारांच्या प्रतिनिधींना ते दाखवले जाते.किती गोष्टी दाखवायचे अजून ? आणखी कुठल्या प्रक्रियेमध्ये इतक्या पातळ्यांवर इतरांना सहभागी करून घेतले जाते हे दाखवा असेही राजीव कुमार म्हणाले.यासंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास ती दाखल करण्याची तरतूद आहे.प्रत्येक स्तरावर अशी तक्रार तुम्ही करू शकता पण असे आजपर्यंत झाले नाही असेही ते म्हणाले.
मतदान यंत्रांमधील बॅटरी एकदाच वापरता येते असे निवडणूक आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.ही बॅटरी एकदाच वापरता येण्यासारखी आहे. एकदा टाकली की ५ ते ७ दिवस चालते.ईव्हीएमच्या बॅटरीमध्ये आम्ही एक सोय केली आहे.बॅटरी चालू झाल्यानंतर किती टक्के आहे आणि किती प्रमाणात वापरली जाते या दोन गोष्टी तिथे दिसतात त्यामुळे ७.४ ते ८ व्होल्टेजदरम्यान वापर असेल तर ती सामान्य परिस्थिती आहे. कमिशनिंगवेळी मॉक पोल होते.मतदान केंद्रावरही मॉक पोल होते.मतदानाची संख्या कमी-जास्त असते त्यामुळे प्रत्येक ठिकाणी बॅटरीची टक्केवारी वेगवेगळी दिसू शकते.जिथे व्होल्टेज ७.४ च्या खाली येईल तेव्हा तिथे अलर्ट यायला सुरुवात होईल.५.८ वर व्होल्टेज येईल तेव्हा बॅटरी अलर्ट देईल की आता हे बंद होऊ शकेल बॅटरी बदला असेही निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे.