भडगाव येथे विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातुन रंगला उर्दू प्रश्नमंजुषा स्पर्धेचा रंगतदार मुकाबला !!
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
भडगाव तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन नुरानी लॉन्स भडगाव येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.या स्पर्धेचे उद्घाटन व अध्यक्षस्थान पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले व त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष ऊर्जितावस्था प्राप्त झाली.या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांनी सहभागी होत आपली बुद्धिमत्ता व ज्ञानसंपदा सादर केली.सहभागी शाळांमध्ये जि.प.बॉईज स्कूल भडगाव,जि.प.कन्या शाळा क्र.१ भडगाव,गिरड जि.प.उर्दू शाळा,कजगाव उर्दू जि.प.शाळा,यशवंत नगर उर्दू जि.प.शाळा,तोंडगाव उर्दू जि.प. शाळा,पिंपरखेड जि.प.उर्दू शाळा,भडगाव जि.प.शाळा क्र.२ उर्दू,अँग्लो उर्दू हायस्कूल व वाय.एम.उर्दू हायस्कूल या शाळांचा समावेश होता.प्रश्नमंजुषा स्पर्धेत इतिहास,भूगोल,विज्ञान,चालू घडामोडी तसेच सामान्य ज्ञान या विषयांवरील प्रश्न विचारण्यात आले.विद्यार्थ्यांनी दिलेली अचूक उत्तरे व दाखवलेली तत्परता आणि आत्मविश्वास उल्लेखनीय ठरला.स्पर्धेदरम्यान प्रत्येक योग्य उत्तराला सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक मंडळातील पदाधिकाऱ्यांनी केले.अध्यक्षीय भाषणात आमदार किशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची ज्ञानपिपासा वाढते.स्पर्धात्मक परीक्षांसाठी लागणारे सर्वांगीण भान विकसित होते.भविष्यातील सुजाण व जबाबदार नागरिक घडविण्यासाठी या स्पर्धा निश्चितच उपयुक्त ठरतात.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सय्यद अल्ताफ अली उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी गणेश पाटील,रावसाहेब रोहिदास पाटील,सलीम शेख लाल कासोदा, नासिर खान चाळीसगाव,अरमान खान मिसरी खान धरणगाव,आरिफ शेख कादर ग्रीनपार्क भडगाव,शिवसेनेचे डॉ.प्रमोद पाटील,इमरान अली सैय्यद,एस एम सी कन्या नंबर १ चे अध्यक्ष हाजी जाकीर कुरेशी,एस एम सी बॉईज चे अध्यक्ष नजीर मुजावर,अँग्लो उर्दू हाय स्कुल चे मुख्याध्यापक मिर्झा नाजीम,सामाजिक कार्यकर्ते जमाल कासार,मुजम्मील शेख,साबीर खान,पत्रकार अबरार मिर्झा, पत्रकार जावेद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.याशिवाय जि.प.उर्दू विविध शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षकवृंद,पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सदर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आला असून यात प्रथम क्रमांक जि.प.बॉईज स्कूल,भडगाव,द्वितीय क्रमांक जि.प.उर्दू कन्या शाळा क्र.१,भडगाव,तृतीय क्रमांक जि.प.उर्दू कन्या शाळा क्र.२ भडगाव यांनीसंपादन केला आहे.विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व आकर्षक बक्षिसे प्रदान करून गौरविण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा आनंद आणि उत्साह झळकत होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साबीर आफाक यांनी केले तर आभार प्रदर्शन जाईद सर यांनी करून उपस्थित मान्यवरांचे व सहभागींचे आभार मानले.