बारामतीतील सराईत गुन्हेगाराची थेट नागपूर कारागृहात रवानगी !! एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध !!
सनी पटेल,पोलीस नायक
बारामती-जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.१५ मार्च २६ रविवार
बारामती तालुका पोलीस ठाण्याने परिसरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारावर कठोर कारवाई करत त्याला थेट नागपूर मध्यवर्ती कारागृहात नुकतेच पाठविण्यात आले आहे.महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) १९८१ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून संबंधित आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,तांदुळवाडी ता.बारामती येथील सुरेंद्र रवींद्र काजळे याच्याविरुद्ध पुणे ग्रामीण तसेच बारामती परिसरातील विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.दरोडा,दुखापत,गंभीर दुखापत,विनयभंग तसेच फसवणूक अशा विविध गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.वारंवार गुन्हे करूनही त्याच्यात कोणतीही सुधारणा होत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले त्यामुळे त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार,हातभट्टीवाले,धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (एमपीडीए) अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला.
सदरील प्रस्ताव पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे पाठविण्यात आला व सर्व कागदपत्रांची छाननी करून जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपीस एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला नागपूर मध्यवर्ती कारागृहात हलविले.बारामती तालुका पोलिसांच्या या निर्णायक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.सदर कामी बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार,पोलीस अंमलदार महेश बनकर तसेच सागर देशमाने आणि विकास खाडे यांनी कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.