जळगावमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर !! शिंदे गटाच्या पहिल्या उमेदवाराची आतापासून घोषणा !!
जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ मे २६ मंगळवार
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन एक वर्ष उलटले असले तरी भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद आता अधिक स्पष्टपणे समोर येऊ लागले आहेत.विशेषतः विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांतील तणाव वाढल्याचे चित्र आहे.परिणामी आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार की स्वतंत्रपणे मैदानात उतरणार ? याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान या चर्चांना अधिक खतपाणी घालणारे वक्तव्य शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख विलास लांडे यांनी केले असून थेट जळगाव शहराच्या भावी आमदाराच्या नावाची घोषणा करून त्यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे.परिणामी भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आली असल्याची चर्चा राजकीय जाणकारांकडून चर्चिली जात आहे.
दरम्यान सध्या शिवसेनेकडून राज्यभर ‘एसआयआर’ अभियान राबवले जात असून या मोहिमेअंतर्गत पक्षाची बूथस्तरावरील ताकद तपासणे,कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करणे आणि आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी करणे यावर भर दिला जात आहे.जळगाव जिल्ह्यातही या अभियानाला सुरुवात झाली असून याच पार्श्वभूमीवर शहरात शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली.या बैठकीत आगामी राजकीय रणनीती,संघटन बांधणी आणि निवडणुकीच्या तयारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.सदर बैठकीस शिवसेनेचे संपर्कप्रमुख विलास लांडे,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील,जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे,महिला आघाडी जिल्हा समन्वयक सरिता माळी आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीला जळगाव शहर व ग्रामीण भागातील तब्बल ३०० हून
अधिक प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.सदरहू कार्यकर्त्यांचा उत्साह आणि उपस्थिती पाहता शिवसेना आगामी निवडणुकांसाठी स्वतंत्र ताकद उभी
करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा या बैठकीनंतर सुरू झाली.
सदर बैठकीत मार्गदर्शन करतांना विलास लांडे यांनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भुसावळ येथील ऐतिहासिक सभेची आठवण सांगितली व निवडणुकीच्या तोंडावर एका सभेत बाळासाहेबांनी अचानक उमेदवार बदलून दिलीप भोळे यांच्या नावाची घोषणा केली होती हा प्रसंग त्यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडला.त्यानंतर त्यांनीही अचानकपणे ‘जळगाव शहराचे पुढचे आमदार विष्णू भंगाळे असतील अशी घोषणा केली.विलास लांडे यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली.अनेकांसाठी ही घोषणा धक्कादायक ठरली तर काहींनी याकडे आगामी राजकीय रणनीतीचा भाग असल्याचे सांगितले.विशेष म्हणजे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात असून महायुतीमध्ये जागावाटपाच्या चर्चेपूर्वीच शिवसेनेकडून भावी उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले असल्यामुळे साहजिकच भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहे.त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधीच दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढलेला असतांना या घोषणेमुळे महायुतीतील मतभेद अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान महायुतीतील स्थानिक पातळीवरील समन्वयाचा अभाव अनेक ठिकाणी उघड होत असून आगामी काळात जागावाटपावरून संघर्ष आणखी वाढू शकतो अशी चर्चा चर्चिली जात आहे.