चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा खुनाच्या प्रयत्नातील आरोपी अखेर आमराई परिसरातून जेरबंद !! बारामती शहर पोलिसांचे विशेष कोंबिंग ऑपरेशन यशस्वी !!
सनी पटेल,पोलिस नायक
पुणे जिल्हा विभागीय प्रमुख
दि.११ जुलै २६ शनिवार
बारामती शहर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील तब्बल चार महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला विशेष कोंबिंग ऑपरेशनद्वारे अटक करत मोठे यश मिळवले आहे.पोलिसांच्या गोपनीय माहितीच्या आधारे आमराई परिसरात राबविण्यात आलेल्या कारवाईत श्याम विलास सकट याला ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,५ मार्च २०२६ रोजी बारामतीतील इंदापूर चौक परिसरातील हॉटेल गोकुळ येथे फिर्यादी आशिष प्रदीप केकाण यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता व या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर व शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या.या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान या गुन्ह्यातील एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले होते व त्याच्याकडून हल्ल्यात वापरण्यात आलेला कोयता जप्त करण्यात आला असून त्याला न्यायालयाच्या आदेशानुसार निरीक्षणगृहात पाठविण्यात आले होते मात्र या गुन्ह्यातील मुख्य आरोपी श्याम सकट हा सतत पोलिसांना चकवा देत फरार होता.
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी छापे,नातेवाईकांची चौकशी तसेच न्यायालयामार्फत जाहीरनामाही प्रसिद्ध केला होता व अखेर काल १० जुलै २६ शुक्रवार रोजी आमराई परिसरात राबविण्यात आलेल्या विशेष कोंबिंग ऑपरेशनदरम्यान खात्रीशीर माहितीच्या आधारे आरोपी एका घरात लपून बसल्याचे निष्पन्न झाले व पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला अटक केली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे,यशवंत पवार तसेच संतोष जगताप,कविटके,दत्ता मद यांनी सहभाग नोंदवित सदर आरोपीस अटक करण्यात यश मिळविले आहे.सदरील कामगिरीबद्दल परिसरातून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.