Just another WordPress site

‘नीट-२०२४’ पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट !! मुख्य सूत्रधार संजीव मुखियाला CBI ची क्लीन चिट !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२३ जुलै २६ गुरुवार

देशभरात प्रचंड वादळ उठवणाऱ्या ‘नीट २०२४’ पेपरफुटी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार आणि ‘किंगपिन’ संजीव कुमार उर्फ संजीव मुखियाला केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठा दिलासा दिला असून या पेपरफुटीच्या गुन्ह्यात संजीव मुखियाचा थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे तपासात समोर आलेले नाहीत असे स्पष्ट करत CBI ने त्याला क्लीन चिट दिली आहे.सन २०२४ मध्ये NEET चा पेपर फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती व या प्रकरणाचा प्राथमिक तपास बिहार पोलिसांकडे होता.संजीव मुखिया यापूर्वीही इतर भरती परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांमध्ये आरोपी राहिल्यामुळे बिहार पोलिसांनी संशयावरून त्याला या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून FIR मध्ये नामनिर्देशित केले होते.तथापि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा तपास CBI कडे सोपवला.CBI ने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत प्रश्नपत्रिका चोरीपासून ती वाटण्यापर्यंतच्या प्रत्येक साखळीचा पर्दाफाश केला.

CBI प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार या घोटाळ्यात सहभागी असलेल्या प्रत्येक मुख्य आरोपीची आणि त्याचा लाभ घेणाऱ्यांची ओळख पटवण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणात पाटणा न्यायालयासमोर तब्बल ४५ जणांविरोधात विविध दोषारोपपत्रे (Chargesheets) दाखल करण्यात आली आहेत.मात्र प्रदीर्घ आणि सखोल तपासादरम्यान संजीव मुखियाचा २०२४ च्या NEET-UG प्रश्नपत्रिका चोरीत किंवा तिच्या वाटपात सहभाग असल्याचे दर्शवणारा एकही पुरावा CBI ला मिळाला नाही.“आम्ही या कटातील प्रत्येक आरोपीची ओळख पटवली असून कोणीही कायद्याच्या तावडीतून सुटणार नाही याची खात्री केली आहे.परंतु संजीव मुखियाविरुद्ध कोणतेही पुरावे न आढळल्याने
त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही,” असे CBI च्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान तपासाच्या सुरुवातीच्या काळात संजीव मुखिया फरार झाला होता व नंतर बिहार पोलिसांनी त्याला अटक केली.CBI ने या प्रकरणात त्याला कोठडीत घेऊन चौकशी केली परंतु पुरावे न मिळाल्याने त्याच्यावर चार्जशीट दाखल झाली नाही त्यामुळे या प्रकरणात त्याला जामीन मंजूर झाला.मात्र NEET-UG प्रकरणात जामीन मिळालेला असला तरी संजीव मुखिया सध्या तुरुंगातच राहणार आहे.बिहार पोलिसांकडे नोंद असलेल्या इतर काही जुन्या पेपरफुटी प्रकरणांमध्ये तो आरोपी असल्याने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.CBI च्या या खुलाशामुळे आता NEET-UG २०२४ पेपर लीक प्रकरणाच्या मूळ सूत्रधारांबाबत सुरू असलेल्या चर्चांना विराम मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.